नवी दिल्ली | 18 सप्टेंबर 2023 : आजपासून संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे. पाच दिवस हे अधिवेशन चालणार आहे. अधिवेशनापूर्वी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. ही बैठक पार्लमेंट लायब्ररी इमारतीत पार पडली होती. यावेळी विरोधकांनी महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याची मागणी केली. लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी एकूण जागांपैकी एक तृतियांश जागा राखीव ठेवण्याची तरतूद करावी, अशी विरोधकांची मागणी आहे. दरम्यान, आज होणाऱ्या अधिवेशनात कोणते निर्णय होणार हे गुलदस्त्यात आहे. विरोधकांची मागणी नसताना पंतप्रधान मोदी यांनी हे अधिवेशन बोलावल्याने आजच्या अधिवेशनात मोदींचं धक्कातंत्र पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे.
संसदेच्या अधिवेशनाचं आजच्या पहिल्या दिवसाचं कामकाज जुन्या संसदेत होईल. त्यानंतर उद्या 19 सप्टेंबरपासून नव्या संसदेत कामकाजाला सुरुवात होणार आहे. नव्या संसदेत जाताना संसदेचे कर्मचारी नेहरू जॅकेट आणि खाकी रंगाची पँट परिधान करून जाणार आहेत.
संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी संसदेतील कामकाजाची माहिती दिली. संसदेत एकूण आठ विधेयक मंजूर करण्यात येणार आहेत. कालच्या बैठकीत विरोधकांनी काही सूचना केल्या आहेत. या विधेयकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाचं एक विधेयक आणि एससी, एसटी संबंधित तीन विधेयकांना यात जोडावं, अशी सूचना विरोधकांनी केली आहे, अशी माहितीही प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. पाच दिवस हे अधिवेशन चालेल अशी माहिती त्यांनी दिली.
पहिल्या सूचीबद्ध विधेयकात मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबतचं विधेयक यात सामील आहे. हे विधेयक मागच्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेत सादर करण्यात आलं होतं. त्याला विरोधकांनी विरोध केला होता. दरम्यान, या विधेयकाबाबत अधिकृत माहिती कुणी दिलेली नाहीये.
दरम्यान, उद्या मंगळवारी सकाळी 9.30 वाजता खासदारांचा ग्रुप फोटो घेतला जाणार आहे. या ग्रुप फोटोसाठी संसदेच्या जुन्या इमारतीत व्यवस्था करण्यात आली आहे. नव्या संसद भवनात प्रवेश करण्यासाठी खासदारांना ओळखपत्र देण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार 19 सप्टेंबर रोजी कॅटरिंगही नव्या इमारतीत शिफ्ट होणार आहे.