पाटणा : नोकरी मिळाली नाही म्हणून अनेक जण नैराश्यात जातात. नैराश्यातून नको तो भलतासलता टोकाचा निर्णय घेऊन टाकतात. पण काहीजण अशा कठीण प्रसंगातही योग्य संधी शोधतात. प्रामाणिकपणे कामं करतात आणि डोंगराएवढं यश मिळवतात. त्यांना इतकं यश मिळतं की ते आकाशाला गवसणी घालतात. हे यश त्यांना इतक्या सहजासहज मिळालेलं नसतं. त्यासाठी त्यांना कित्येक रात्री जागावं लागत असतं. अहोरात्र मेहनत करावी लागते. झटावं लागतं, एकांतात ढसाढसा रडावं लागतं आणि परिस्थितीशी झुंजावं लागतं. तेव्हा कुठे ते यश त्यांना प्राप्त होतं. पण जेव्हा प्राप्त होतं तेव्हा ते इतकं भरभरुन देतं की त्याची तुम्ही कधीच कल्पना देखील करु शकणार नाहीत. बिहारच्या सध्या सुशिक्षित एका ग्रॅज्युएट चहावाली प्रियंका गुप्ता हिची कहाणी यापेक्षा काही कमी नाही.
खरंतर आयुष्यात यशस्वी होण्याचे अनेक चांगली मार्ग आहेत. फक्त आपण खचायला नको. आपण प्रयत्न करायचे आणि लवकर हार मानायची नाही. एक वेळ अशी येईल की तुम्ही त्या कामात पटाईत व्हाल आणि त्या कामात तुम्हाला चांगलं यश मिळायला लागेल. हळूहळू तुम्हाला आपल्या कामातून मिळणाऱ्या पैशातून दुसरंही काहीतरी काम सुरु करता येऊ शकेल किंवा तुम्ही काही पैशांची गुंतवणूक करुन आणखी काही पैसे कमवू शकाल. खरंतर सध्या नोकरीसाठी तरुणांना वणवण भटकावं लागतंय. हे वास्तव आहे. या वास्तवाला नाकारता येणार नाही. पण अशा कठीण प्रसंगात नोकरी सोडून व्यवसाय करण्यात आपलं नशीब आजमावलं तर तुम्हाला यश नक्कीच मिळू शकतं. फक्त आपण आपल्या कामाशी प्रमाणिक राहायचं. मग यश तुम्हाला निश्चितच मिळेल.
प्रियंका गुप्ता या तरुणीची नाव बिहार आणि उत्तर प्रदेशात अभिमानाने घेतलं जातंय. विशेष म्हणजे तिच्या यशाचं कौतुक आता संपूर्ण देशातही होतंय. त्यामुळे प्रियंकाची कहाणी आम्हाला तुम्हाला सांगाविशी वाटतेय. प्रियंका ही कधी एकेकाळी पाटण्याच्या रस्त्यांवर चहा विकायची. पण आज तिने तिचा चहाचा व्यवसाय यशस्वी करुन दाखवलाय. तिने ‘ग्रॅज्युवेट चहावाली’ नावाचं एक ब्रँड बनवलं आहे. विशेष म्हणजे आज तिने ‘ग्रॅज्युवेट चहावाली’ ब्रँडच्या दुकानाच्या सहाव्या शाखेचं मोठ्या धुमधडाक्यात उद्घाटन केलंय. त्यामुळे तिचं सर्वत्र कौतुक होत आहे. प्रियंकाने आज बिहारच्या कटिहार येथे तिच्या चहाच्या दुकानाची सहावी शाखा सुरु केलीय.
प्रियंका गेल्या तीन वर्षांपासून पाटण्यात चहाचा व्यवसाय करतेय आणि आता ती तिच्या चहाच्या ब्रँडची फ्रेंचायजी देत आहे. हे खरंच कौतुकास्पद आहे. प्रियंकाने सांगितलं की, एका आऊटलेटसाठी 5 ते 6 लाख रुपयांची गुंतवणूक केली जाते. ही रक्कम फ्रेंचायजी घेणारा खर्च करतो. त्यासाठी ग्रॅज्युएट चहावाली प्रियंका गुप्ता ही एकाच वेळी अडीच लाख रुपये घेते. त्यानंतर आउटलेटमध्ये क्वालिटीला मेंटेन ठेवावं लागतं. विशेष म्हणजे प्रियंका आता तिच्या ब्रँडचं पुढचं आउटलेट हे उत्तर प्रदेशात सुरु करणार आहे.
प्रियंका गुप्ताने तिच्या संघर्षाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “मला पाटण्याच्य रस्त्यावरुन चहा विकण्यापासून ते आऊटलेट उघडण्यापर्यंत खूप संघर्ष करावा लागला. मी माझं पदवीच्या शिक्षणानंतर लगेच चहाच्या व्यवसायात उतरली नाही. तर दोन वर्ष मी सरकारी नोकरीसाठी प्रयत्न केले. पण जेव्हा नोकरी मिळाली नाही तेव्हा कामाबद्दल विचार करायला लागली. नोकरीसाठी बिहारमध्ये प्रयत्न केले नव्हते. मी उत्तर प्रदेशात शिक्षण घेतलं. तिथेच सरकारी नोकरीसाठी प्रयत्न केले”, असं प्रियंकाने सांगितलं.
“मी केंद्र सरकारच्या नोकरीसाठी देखील अतोनात प्रयत्न केले. पण कदाचित तरिही माझे प्रयत्न कमी पडले. आपल्या इथे लोकसंख्या इतकी आहे की सगळ्यांनाच नोकरी मिळणं कठीण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर राहायला सांगितलं आहे. त्यामुळे तुम्ही नोकरीतून आत्मनिर्भर बना, असं आवश्यक नाही. तुम्ही व्यवसायातूनही आपलं करिअर घडवू शकता”, असं प्रियंका गुप्ता म्हणाली.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्पातून सिद्धी मिळवण्याचं आवाहन केलं होतं. मी त्यांच्या या आवाहनाने प्रभावित झाली. त्यातूनच चहाचा व्यवसाय सुरु केला. कारण या व्यवसायात फार कमी गुंतवणूक आहे. रिस्क नाही. तुम्ही चहाच्या ठेल्यापासून काम सुरु करत असाल तर पैशांची गुंतवणूक फार कमी आहे. याशिवाय तुम्हाला मोबदलाही चांगला मिळतो”, असं प्रियंकाने सांगितलं.