नवी दिल्ली – भाजपा 2024 ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागल्याचे दिसते आहे. 350 हून जास्त जागा निवडणून आणण्याचे टार्गेट घेत त्यासाठी त्यांचे प्रयत्नही सुरु झाले आहेत. दुसरीकडे काँग्रेस (Congress)लोकसभा तर दूर, पण या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठीही उभी राहताना दिसत नाहीये. विधानसभा निवडणूक होऊ घातलेल्या राज्यांत काँग्रेसला एकामागून एक धक्के बसत आहेत. नुकतेच जम्मू काश्मीरमध्ये पक्षाचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Gulab Nabi Azad)यांनी निवडणूक अभियान समितीचे अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला आहे. या धक्क्यातून काँग्रेस सावरत नाही तोच, हिमाचल प्रदेशातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आनंद शर्मा (Aanand Sharma)यांनी निवडणूक सुकाणू समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत, पक्षश्रेष्ठींना चिंतेत टाकले आहे.
हिमाचल प्रदेश निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेल्या निवडणूक सुकाणू समितीच्या अध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिला आहे. याबाबत आनंद शर्मा यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. 26 एप्रिल रोजी त्यांना ही जबाबदारी देण्यात आली, मात्र त्यानंतर आत्तापर्यंत त्यांची भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही, असा आक्षेप आनंद शर्मा यांनी घेतलेला आहे. दिल्ली आणि शिमला येथए होत असलेल्या निवडणुकांबाबतच्या महत्त्वाच्या बैठकांना बोलावण्यातही येत नाही, असा आक्षेप त्यांनी नोंदवला आहे. या कारणामुळे सुकाणू समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी लिहिले आहे. पक्षाच्या निवडमूक प्रचरात सहकार्य करत राहीन असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आनंद शर्मा हे हिमाचलमधील काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत. आपल्या स्वाभिमानाला धक्का बसल्यामुळे हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी या पत्रात नमूद केलेले आहे. काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या जी 23 सदस्यांत आवनंद शर्मा हेही होते.
हिमाचल प्रदेशात गुजरातसोबतच येत्या नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या सगळ्या काळात आनंद शर्मा यांचा राजीनामा हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानण्यात येतो आहे. आनंद शर्मा हे जनतेतील नेते नसले तरी पक्षात त्यांचे स्थान मोठे आहे. मनमोहन सिंग यांच्या दोन सरकारांमध्ये ते मंत्रीपदावर राहिलेले आहेत. गेल्या वर्षी राज्यसभेची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे ते पक्षावर नाराज असल्याचे मानण्यात येते आहे. त्यांनी अनेकदा काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या निर्णयावर शंका उपस्थित केल्या आहेत. हिमाचल प्रदेशात ज्यावेळी काँग्रेसने एकजूट होत निवडणुका लढवण्याची वेळ आहे, त्याचवेळी आनंद शर्मा यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसमध्ये काही आलबेल नसल्याचे स्पष्ट केले आहे.
हिमाचल प्रदेशात एकदा काँग्रेस, एकदा भाजपा अशी सरकारे स्थापन होत असत. 2017 साली हिमाचल प्रदेशातून काँग्रेसला सत्तेतून भाजपाने पायउतार केलेले आहे. त्यामुळे यावेळी भाजपाला हरवून पुन्हा सत्ता स्थापन करण्याचे मोठे आव्हान काँग्रेसपुढे आहे. शर्मा यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आणि गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा सत्तेत येण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांचे आव्हानही वाढले असे मानण्यात येते आहे.
इतर राज्यांप्रमाणे हिमाचल प्रदेशातही काँग्रेस नेत्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरु झालेली आहे. नेत्यांमध्ये समन्वयासाठी प्रभारी राजीव शुक्ला प्रयत्नशील आहेत. त्यासाठी ते प्रयोगही करत आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्वी प्रतिभा सिंह यांना प्रदेशाध्यक्ष पद दिले आहे. पक्षात संतुलन राहण्यासाठी चार कार्याध्यक्षांची नियुक्तीही करण्यात आली आहे. मात्र तरीही पक्षातील गटबाजी थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीये. चार दिवसांपूर्वीच पक्षातील दोन आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. काँग्रेसमधील आणखी काही आमदार फुटण्याचे संकेतही भाजपाने दिले आहेत. भापा पुन्हा एकदा हिमाचलमध्ये सत्तेत येऊन पॅटर्न तोडण्याच्या तयारी असल्याचे दिसते आहे. काँग्रेस मात्र त्यांच्या अंतर्गत संघर्षातून बाहेर येताना दिसत नाहीये.