IAS Success Story : नागरी सेवा परीक्षेत यश मिळवणं कोणालाही शक्य नसतं. जे अतिमेहनत घेत जिद्द आणि चिकाटी बाळगतात त्यांनाच अधिकारी होता येतं. UPSC परीक्षेत फार कमी लोक आहेत ज्यांना यश मिळालयं. अशीच एक तरुणी आहे जीने पहिल्याच प्रयत्नात यशाची चव चाखली आहे. सुरभी गौतम असं या आयएएस अधिकारीचं नाव आहे. मध्य प्रदेशातील एका छोट्या गावातली ती राहणारी. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार. शालेय दिवसांपासून सुरभी तिच्या वर्गात टॉप करायची. 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेतही तिने मर्यादित साधनांसह आणि कोणतीही शिकवणी न घेता 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवले. वडील दिवाणी न्यायालयात वकील होते. आई शिक्षिका होती.
शालेय शिक्षणानंतर तिने राज्य अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा दिली. या परीक्षेत उत्तीर्ण झाली. गावातून उच्च शिक्षणासाठी शहरात आलेली ती पहिली मुलगी होती. सुरभीने भोपाळमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केले. विद्यापीठात अव्वल आली.
सुरभी गौतमने BARC मध्ये अणुशास्त्रज्ञ म्हणून एक वर्ष काम केले. GATE, ISRO, SAIL, MPPSC PCS, SSC CGL, दिल्ली पोलीस आणि FCI सारख्या परीक्षा देखील उत्तीर्ण केल्या. एवढेच नाही तर 2013 मध्ये झालेल्या IES परीक्षेत त्याने AIR 1 मिळवला. मात्र गावातील संगोपनामुळे सुरभीला इंग्रजी अस्खलित बोलण्यात नेहमीच अडचण येत होती. इंग्रजी नीट बोलता येत नसल्याने वर्गात तिची अनेकदा चेष्टा करण्यात आली. पण ती निराश झाली नाही. तिचे संवाद कौशल्य सुधारण्यासाठी, सुरभीने दररोज 10 नवीन इंग्रजी शब्द शिकण्याचा निर्णय घेतला.
यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत यश मिळवत तिने सगळ्यांची तोंड बंद केली. सुरभीला तिच्या मेहनतीचे फळ मिळाले. 2016 मध्ये ती देशात 50 व्या स्थानावर होती. तिची ही स्टोरी अनेकांसाठी आता प्रेरणा देणारी ठरत आहे.