मुंबई | 29 सप्टेंबर 2023 : देशातील आघाडीच्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांनी गेल्या 20 वर्षांमध्ये स्वतःसाठी एकसुद्धा साडी खरेदी केली नाही. सुधा मूर्ती यांची गणना भारतातील सर्वात श्रीमंत महिलांमध्ये होते. तरीसुद्धा गेल्या दोन दशकांपासून त्या केवळ लोकांकडून भेट म्हणून मिळालेल्या साड्याच नेसत आहेत. 73 वर्षीय सुधा मूर्ती या त्यांच्या बहिणीकडून, जवळच्या नातेवाईकांकडून आणि स्वयंसेवी संस्थांकडून मिळालेल्या साड्याच स्वीकारत आहेत. त्याव्यतिरिक्त त्यांनी स्वत:साठी शॉपिंग केली नाही. एकेकाळी सुद्धा मूर्तींना शॉपिंगची खूप जास्त आवड होती. विविध प्रकारचे कपडे खरेदी करणं त्यांना खूप आवडायचं. मात्र आता त्या आपल्या ‘नो शॉपिंग पॉलिसी’मुळेच खूप खुश आणि समाधानी आहेत.
सुधा मूर्ती यांनी स्वतःमध्ये हा बदल वाराणसी दौऱ्यानंतर आणला आहे. त्यावेळी त्यांनी सर्वसामान्य गरजा म्हणजेच जे अन्न, पाणी आणि औषधांच्या बदल्यात शॉपिंगचा त्याग करण्याचं वचन दिलं होतं. सुधा मूर्ती यांनी सांगितलं की, “काशी गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व आवडीच्या गोष्टी सोडाव्या लागतात. मला शॉपिंग करायला खूप जास्त आवडायचं. मात्र काशी गेल्यानंतर मी आयुष्यात पुन्हा कधीच शॉपिंग करणार नाही असं वचन गंगेला दिलं.”
सुधा मूर्तींनी सांगितलं की त्यांची आई आणि बहिणीने त्यांना आयुष्यात खूप काही शिकवलं. कमीत कमी गोष्टींमध्ये आयुष्य कसं जगलं जातं हे त्यांच्याकडूनच शिकायला मिळाल्याच त्या म्हणतात. “सहा वर्षांपूर्वी जेव्हा माझ्या आईचं निधन झालं, तेव्हा त्यांचं कपाट रिकामं करण्यासाठी मला फक्त अर्धा किंवा एक तास लागला होता. कारण त्यांच्याकडे केवळ आठ ते दहाच साड्या होत्या. जेव्हा 32 वर्षांपूर्वी माझ्या आजीचं निधन झालं, तेव्हा त्यांच्या कपाटातही फक्त चारच साड्या होत्या. या दोघांचा आदर्श ठेवत आपणही आयुष्यात कमीत कमी गोष्टी विकत घ्यायच्या आणि समाधानी जीवन जगायचं असं ठरवलं. ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी शिकवण होती. कमीत कमी गोष्टींमध्ये साधं जीवन जगायला मला फारच सोपं वाटतं,” असं सुद्धा मूर्ती म्हणाल्या.
याविषयी त्यांनी पुढे सांगितलं की, पती नारायण मूर्ती यांनी लग्नाच्या वेळी त्यांना फक्त दोन साड्या भेट म्हणून दिल्या होत्या. “त्या दोन साड्या पाहूनच मी फार खुश झाले होते. मला त्यापेक्षा फार काही नकोच होतं. आजसुद्धा मला ऋतुनुसार बदलणारे ट्रेंड्स समजत नाहीत. तुम्ही कधीपर्यंत फॅशनसोबत चालू शकता,” असा सवाल त्यांनी केला. तर दुसरीकडे सुद्धा मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती ही स्वतः एक फॅशन डिझायनर आहे. अक्षता मूर्ती यांचं लग्न ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक यांच्याशी 2009 मध्ये झालं होतं.