भोपाळ: मध्यप्रदेशातील मुरैना येथे दोन लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहेत. यापैकी एक विमान सुखोरी-30 असून दुसरं मिराज 2000 आहे. दुर्घटनेनंतर दोन्ही विमानात भीषण आग लागली. दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर एअर बेसमधून उड्डाण केलं होतं. मात्र, काही कारणामुळे दोन्ही विमानाची हवेत टक्कर झाली. त्यामुळे दोन्ही विमान कोसळले. विमान अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि विमान प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी बचाव कार्य सुरू केलं आहे. अपघाताचं नेमकं कारण समजू शकलं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाचं लढाऊ विमान क्रॅश झालं. मुरैना जिल्ह्यातील पहाडगड विकासखंड येथील जंगलात हा अपघात झाला. दोन्ही विमान हवेतच एकमेकांना धडकले. त्यामुळे हवेतच विमानांना आग लागली. त्यामुळे दोन्ही विमान वेगाने जमिनीच्या दिशेने झेपावले. मात्र, पायलटने प्रसंगावधान राखल्याने हे दोन्ही वि्मान जंगलात कोसळले. त्यामुळे कैलारस आणि पहाडगड शहरावरील मोठी आपत्ती टळली.
या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीमही घटनास्थळी दाखल झाली. हा अपघात अत्यंत भीषण होता. सुदैवाने या अपघातात दोन्ही विमानातील पायलट बचावले आहेत. त्यामुळे अपघात नेमका कसा झाला? याची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
#WATCH | Wreckage seen. A Sukhoi-30 and Mirage 2000 aircraft crashed near Morena, Madhya Pradesh. Search and rescue operations launched. The two aircraft had taken off from the Gwalior air base where an exercise was going on. pic.twitter.com/xqCJ2autOe
— ANI (@ANI) January 28, 2023
दरम्यान, या अपघातानंतर पोलिसांनी अपघात स्थळी कोंबिंग सुरू केली आहे. स्थानिक लोकांच्या मदतीने ही कोंबिंग सुरू आहे. या अपघातात किती आणि कोणते नुकसान झाले याची माहिती घेतली जात आहे. या दुर्घटनेनंतर जंगलात विमानाचे अवशेष विखूरल्याचं सांगितलं जात आहे. मिराजमध्ये किती पायलट होते, याची माहिती मिळू शकली नाही.
या दुर्घटनेची माहिती मिळताच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हवाई दलाच्या प्रमुखांना फोन करून या दुर्घटनेची संपूर्ण माहिती घेतली. या दुर्घटनेची माहिती घेतल्यानंतर राजनाथ सिंह यांनी या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आणि या दुर्घटनेचा रिपोर्ट लवकरात लवकर संरक्षण मंत्रालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.