प्रदीप कापसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नवी दिल्ली | 8 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता राष्ट्रवादीच्या ताब्यावरून शरद पवार गट आणि अजितदादा गटात मोठा संघर्ष सुरू आहे. दोन्ही गटाने आपलाच पक्षावर ताबा असल्याचं म्हटलं आहे. आता हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला आहे. पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाला द्यायचं यावर आयोगाकडे सुनावणी होत आहे. पहिल्या सुनावणीच्या वेळी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हेच निवडणूक आयोगाकडे गेले होते. आपणच पक्षाचे संस्थापक आहोत. आपणच अध्यक्ष आहोत. त्यामुळे पक्ष हा आपलाच आहे, हे दाखवून देण्यासाठी शरद पवार निवडणूक आयोगाकडे गेले असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, आता राष्ट्रवादीतील या कलहावर आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे.
शरद पवार गटाने अजित पवार गटाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 26 तारखेला ही याचिका दाखल केली होती. त्यात अजित पवार गटाचे 41 आमदार अपात्र करण्याची मागणी करण्यात आली आहे. या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे, अशी माहिती वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे अजितदादा गटाच्या आमदारांचं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्याच्या सुनावणीत दोन्ही गटाकडून काय युक्तिवाद केले जातात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
उद्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात 11 वाजता या याचिकेवर सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादीच्या याचिकेत महत्त्वाचे मुद्दे वेधण्यात आले आहेत. पक्षाच्या विरोधात 9 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. पक्षाची मान्यता नसताना मंत्रीपदाची शपथ घेण्यात आली आहे. त्यामुळे या मंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. यावेळी केशम सिंग (मणिपूर) आणि राजेंद्र सिंह राणा खटल्याचा दाखलाही या याचिकेत देण्यात आला आहे.
तसेच केंद्रीय निवडणूक आयोगात या खटल्यावर सुनावणी सुरू झाली आहे. विधानसभा अध्यक्ष यावर सुनावणी कधी करण्यात येणार असा सवाल शरद पवार गटाकडून विचारण्यात आला आहे. या सर्व प्रकरणावर उद्या सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार? विधानसभा अध्यक्षांना काही निर्देश देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.