नवी दिल्ली | 20 जुलै 2023 : मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची नग्न धिंड काढण्यात आली. त्यानंतर या महिलांवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडीओची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गंभीर दखल घेतली असून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तर, सर्वोच्च न्यायालयानेही या घटनेवरून संताप व्यक्त केला असून केंद्र आणि राज्य सरकारला फटकारलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाने या व्हिडीओवर संताप व्यक्त केला आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारला फटकारलं आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी कठोर शब्दात या घटनेची निर्भत्सना केली आहे. अशा घटना खपवून घेता येणार नाही. व्हायरल झालेला व्हिडीओ चिंताजनक आहे. या प्रकरणी मे महिन्यातच कारवाई करायला हवी होती. या मुद्द्याकडे डोळेझाक करून चालणार नाही, असं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मीडियात जे दाखवण्यात आलं आहे, त्यामुळे आम्ही डिस्टर्ब झालो आहोत. मानवी हक्क आणि महिलांच्या अधिकारांचं हे सर्रासपणे झालेलं उल्लंघन आहे. केंद्र आणि राज्य सरकारने या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याचे आम्ही आदेश देत आहोत, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
सर्वोच्च न्यायालय आता या प्रकरणी येत्या 28 जुलै रोजी सुनावणी करणार आहे. यावेळी मणिपूर सरकार आणि केंद्र सरकारने काय कारवाई केली याची माहिती घेतली जाणार आहे. लोकशाही देशात अशा प्रकारच्या घटना कदापि सहन केल्या जाणार नाही. अशा प्रकारच्या घटना मन हेलावून टाकणाऱ्या आहेत. हे संविधानाच्या अधिकाराचं उल्लंघन आहे, असं सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.
दरम्यान, या घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा संतप्त झाले आहेत. मणिपूरच्या घटनेचा व्हिडीओ पाहून माझ्या मनात चीड निर्माण झाली आहे. मला प्रचंड राग आला आहे. त्या दोन महिलांबाबत जे काही घडलंय त्यामुळे देशाची मान खाली गेली आहे. अशा घटनांमुळे जगभरात देशाची बदनामी होत असते. ज्यांनी कोणी हे कृत्य केलं असेल त्या कुणालाही सोडणार नाही. प्रत्येकाला कठोर शिक्षा केली जाईल, असा सज्जड इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.
मणिपूरमध्ये 4 मे रोजी मैतेई समुदायातील शेकडो लोक कांगकोपकी जिल्ह्यातील केबी फाईनोम गावात शिरले होते. या लोकांच्या हातात शस्त्र होती. त्यांनी गावात शिरताच जाळपोळ सुरू केली. हंगामा सुरू केला. त्यामुळे गावकरी जीव वाचवण्यासाठी पळून गेले. त्यापैकी तीन महिलाही जीव वाचवण्यासाठी जंगलाच्या दिशेने पळाल्या. त्यापैकी दोन महिलाांना काही नराधमांनी घेरलं. त्यांनी या महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढली. त्यानंतर त्यांना शेतात नेऊन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने देशभरातून संतापाची लाट उसळली आहे.