मोठी बातमी ! चोरांचं आडनाव मोदीच का असतं?… मानहानी केसमध्ये राहुल गांधी दोषी; सुरत कोर्टाचा मोठा निर्णय

| Updated on: Mar 23, 2023 | 11:28 AM

तब्बल चार वर्षानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे. सुरत जिल्हासत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं आहे. सर्व चोरांची आडनावे मोदीच का असतात? असं विधान राहुल गांधी यांनी केलं होतं. त्याविरोधात कोर्टात केस दाखल करण्यात आली होती.

मोठी बातमी ! चोरांचं आडनाव मोदीच का असतं?... मानहानी केसमध्ये राहुल गांधी दोषी; सुरत कोर्टाचा मोठा निर्णय
Follow us on

सुरत : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे. कर्नाटकातील एका रॅलीत राहुल गांधी यांनी एक सवाल केला होता. नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचं आडनाव कॉमन कसे? सर्व चोरांची नावे मोदीच का असतात? असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता. या प्रकरणी सुरत न्यायालयात केस सुरू होती. त्यावर निर्णय आला असून सुरत जिल्हा सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवलं आहे. त्यांना याप्रकरणी शिक्षा ठोठावली जाणार आहे. सुनावणीवेळी राहुल गांधी कोर्टात हजर होते.

2019मध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात ही केस करण्यात आली होती. त्यावर सुनावणी सुरू होती. आज या खटल्यावर सुरत जिल्हासत्र न्यायालयाने निर्णय दिला. थोड्याच वेळात शिक्षाही सुनावली जाणार आहे. यावेळी राहुल गांधीही कोर्टात उपस्थित होते. तसेच काँग्रेसचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकोर, आमदार अमित चावडा आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचे गुजरात प्रभारी रघू शर्माही उपस्थित होते. याशिवाय काँग्रेसचे इतर आमदारही कोर्टात उपस्थित होते. त्यापूर्वी राहुल गांधी यांचे वकील किरीट पानवाला यांनी मीडियाशी संवादही साधला होता.

हे सुद्धा वाचा

पूर्णेश मोदींचा आक्षेप

2019च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी दक्षिणेत जोरदार प्रचार केला होता. त्यांची कर्नाटकात एक विराट रॅली झाली होती. या सभेला संबोधित करताना सर्व चोरांची आडनावे मोदीच का असतात? असा सवाल केला होता. राहुल गांधी यांच्या या विधानावर गुजरातचे भाजप नेते आणि आमदार पूर्णेश मोदी यांनी आक्षेप घेतला होता. पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा दावाही केला होता.

मी निर्दोष

राहुल गांधी यांच्या या विधानाने केवळ एखाद्या व्यक्तीचा नव्हे तर संपूर्ण मोदी समुदायाचा अपमान झाला आहे. त्यांच्या विधानामुळे मोदी समुदायाच्या लोकांना मान खाली घालावी लागत आहे, असं पूर्णेश मोदी यांनी म्हटलं होतं. सुरत कोर्टाचे मुख्य न्यायादंडाधिकारी एचएच वर्मा यांच्या कोर्टात या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी पूर्ण झाली होती. त्यानंतर कोर्टाने या प्रकरणावरील तारीख राखून ठेवली होती. राहुल गांधी यांचे वकील किरीट पानवाला यांच्या मते या प्रकरणात राहुल गांधी तीन वेळा कोर्टात हजर झाले होते. यापूर्वी ऑक्टोबर 2021मध्ये त्यांनी आपली साक्षही नोंदवली होती. तसेच आपण निर्दोष असल्याचंही म्हटलं होतं.