Sushasan Mahotsav 2024 : दलदलीत अडकल्यावर वाचवण्याऐवजी मित्रांनी काय केलं?; केंद्रीय मंत्र्याने सांगितला अफलातून किस्सा

| Updated on: Feb 10, 2024 | 6:50 PM

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने सुशासन महोत्सवाचं आयोजन केलं आहे. या महोत्सवात अनेक नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केलं. अनेकांनी आपले अनुभव सांगितले. सुशासनाची सुरुवात कशी करण्यात आली. त्याचा किती फायदा झाला याची माहितीही दिली. केंद्रीय मंत्री तेमजीन इम्ना अलॉन्ग यांनी तर काही गंमतीशीर किस्से ऐकवून या महोत्सवात जान आणली.

Sushasan Mahotsav 2024 : दलदलीत अडकल्यावर वाचवण्याऐवजी मित्रांनी काय केलं?; केंद्रीय मंत्र्याने सांगितला अफलातून किस्सा
temjen imna along
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली| 10 फेब्रुवारी 2024 : गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत सुशासन महोत्सव सुरू आहे. या महोत्सवात सुशासनावर विविध राजकीय नेत्यांकडून मते मांडली जात आहेत. याचवेळी केंद्रीय मंत्री आणि भाजपचा नॉर्थ ईस्टचा चेहरा असलेलेल तेमजेन इम्ना अलॉन्ग यांनी नर्मविनोदी शैलीत काही किस्से सांगितले. त्यामुळे सुशासन महोत्सवात एकच खसखस पिकली. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या गेल्या दहा वर्षाच्या कामांचा हिशोबही दिला. तसेच मोदी सरकारने सुशासनाची प्रत्यक्षात कशी अंमलबजावणी केली याचीही माहिती दिली. त्यांनी आपले व्यक्तिगत अनुभवही सांगितले. आयुष्य जगत असताना थोडी फार चेष्टा मस्करी केली तर बिघडले कुठे? थोडं फार हसलं तर बिघडलं कुठे? पण काही लोकांना गंभीर व्हावं लागतं हे सुद्धा त्यांनी मान्य केलं.

तेमजेन इम्ना अलॉन्ग यांनी त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक किस्से ऐकवले. हे किस्से ऐकून उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकली. तुमच्यातील लहान मुलांसारखी निरागसता कशी जपता? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी मार्मिक उत्तर दिलं. जे मी करतो, ते सर्वांच्या आत असतं. आपण वातावरणाच्यानुसार समाजाच्या प्रभावात येऊन चांगलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत नाही. खरंतर थोडीफार चेष्टा मस्करी केली पाहिजे. हसलं पाहिजे आणि दुसऱ्यांनाही हसवलं पाहिजे, असं तेमजेन इम्ना अलॉन्ग म्हणाले.

तरुण नेते डान्स करू शकत नाही का?

अमित शाह यांच्याकडे अत्यंत गंभीर नेता म्हणून पाहिले जाते. पण त्यांनाही माझ्यासोबत फोटो काढताना हसू अवरता येत नाही, असं ते म्हणाले. तेमजेन यांना डान्स करायला खूप आवडतं. त्यावरही त्यांनी उत्तर दिलं. तरुण नेत्यांनी डान्स केला तर त्यात वाईट काय आहे? तरुण नेते डान्स करू शकत नाही, असं कुठं लिहिलंय? असं कुठं लिहिलंय? असा सवालही त्यांनी केला.

तलावात फसलो अन्…

यावेळी त्यांनी एक गंमतीशीर किस्साही सांगितला. एकदा मी तलावात मासे पकडण्यासाठी उतरलो होतो. त्यावेळी अचानक मी दलदलीत अडकलो. त्यावेळी मी मदतीसाठी हाका मारल्या. अशावेळी मला मदत करायचं सोडून मित्र माझा व्हिडीओ काढत होते, असं सांगतानाच त्यावेळी मासे आणि माझी काय स्थिती झाली असेल याचा विचार न केलेला बरा, असंही ते म्हणाले. त्यांचा हा किस्सा ऐकून उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकली.

व्हॅक्सीन आणि अफवा

कोरोना काळात लोक एकमेकांना भेटायला घाबरत होते. त्यावेळी लोक व्हॅक्सीनही घेत नव्हते. कारण व्हॅक्सीन घेतली तर स्वर्गात जागा मिळणार नाही, अशी अफवा पसरली होती. या अफवेमुळेही लोक घाबरले होते, असं सांगतनाच मी भाजपचा कार्यकर्ता आहे. पण एक माणूसही आहे. त्यामुळे या अफवेमुळे मीही व्हॅक्सिन घ्यायला टाळाटाळ करत होतो. पण मोदींच्या प्रेरणेने सर्वांची हिंमत वाढली. सर्वांना व्हॅक्सीन मिळाली, असंही ते म्हणाले.