बंगळुरु – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा फोटो असलेला बॅनरवरुन दोन गटांमध्ये वाद झाला, त्यात एकावर चाकू हल्ला झाला आहे. सध्या धार्मिक वादांमुळे चर्चेत असलेल्या कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात सांप्रदायिक तणाव निर्माण झाला आहे. वाद वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रशआसनाने या भागात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. ५ जणांपेक्षा जास्त जण जमा झाले तर करावाी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुळात हा वाद सावरकरांचे पोस्टर विरुद्ध टिपू सुल्तानचे पोस्टर यावरुन झालेला आहे. अमीर अहमद सर्कल या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला आहे. कर्नाटकात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने धार्मिक वाद सुरु आहेत. हिजाब प्रकरणापासून या सगळ्याला सुरुवात झाली आहे. दिवसेंदिवस राज्यातील तणाव वाढताना दिसतो आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमीर अहमद सर्कल परिसरात, सोमवारी हिंदुत्ववादी संघटना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बॅनर लावावे यासाठी आग्रही होते. तर मुस्लीम समाज 18 व्या शतकातील राज्यकर्ता टीपू सुल्तान याचे बॅनर या ठिकाणी लावू इच्छित होता. दोन्ही बाजूंकडून आपआपल्या आदर्शांचे बॅनर स्वातंत्र्यदिनी लावण्यावरुन वाद होता. हा वाद इतका वाढला की हे दोन्ही पक्ष एकमेकांना मारण्यासाठी आमनेसामने आले. याच तणावपूर्ण वातावरणात एका व्यक्तीवर चाकू हल्ला करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी या संपूर्म परिसरात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. चाकूहल्ल्यात जखमी व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
काही जणांकडून लावण्यात आलेले बॅनर काढण्यासाठी किंवा त्याला हानी पोहचवण्यासाठीही प्रयत्न करण्यात आल्याची माहिती आहे. च्य़ामुळे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली, दोन्ही बाजूंनी मोठ्या संख्येने पाठिराखे जमा झाले होते. स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. आता अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी तिरंग्याचे बॅनर लावले आहे. ज्या ठिकाण हे दोन्ही समुदाय त्यांचे त्यांचे बॅनर लावण्याच्या प्रयत्नात होते.
वीर सावरकर यांच्या बॅनरला परवानगी मिळावी आणि दुसऱ्या समुहाच्या पक्षाविरोधात कारवाई करण्यात यावी अशी हिंदूत्ववादी संघटनांची मागणी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर या आदर्शाचा अपमान केल्याप्रकरणी कारवाईची मागणी करण्यात आली आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिरिक्त पोलीस दलांच्या तुकड्या तिथे तैनात करण्यात आल्या आहेत. परिसरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.