तुरुंगात बंद असलेल्या या दोन खासदारांचा आज शपथविधी, फोटो-व्हिडिओ काढण्यास मनाई

| Updated on: Jul 05, 2024 | 2:31 PM

खलिस्तानी समर्थक आणि दहशतवाद्यांना फंडिग करण्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या दोन खासदारांचा आज शपथविधी होणार आहे. तुरुंगात असताना देखील हे दोन्ही जण निवडून आलेत. त्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली होती. आता या दोघांचा शपथविधी आज पार पडणार आहे.

तुरुंगात बंद असलेल्या या दोन खासदारांचा आज शपथविधी, फोटो-व्हिडिओ काढण्यास मनाई
Follow us on

आज लोकसभेच्या दोन अशा खासदारांचा शपथविधी होणार आहे जे तुरुंगात बंद आहे. एक आहे पंजाबच्या खांडूर साहिब येथून निवडून आलेले अमृतपाल सिंग आणि दुसरे आहेत बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार शेख अब्दुल रशीद. अमृतपाल सिंह आणि शेख अब्दुल रशीद यांना शुक्रवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या चेंबरमध्ये आणलं जाईल आणि त्याच ठिकाणी त्यांचा शपथविधी होईल. रशीद शेख सध्या तिहार तुरुंगात बंद आहे. तर खलिस्तानी फुटीरतावादी नेता अमृतपाल सिंग आसामच्या दिब्रुगड तुरुंगात बंद आहे. रशीदवर दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याचा आरोप आहे.

अमृतपाल आणि रशीद यांचा शपथविधी

रशीदला लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यासाठी दोन तासांचा पॅरोल देण्यात आला आहे. तर अमृतपाल सिंगला चार दिवसांचा सशर्त पॅरोल देण्यात आला आहे. या कालावधीत त्यांना कोणतेही राजकीय वक्तव्य करण्यास मनाई आहे. त्यांना कोणताही व्हिडिओ बनवता येणार नाही. एवढेच नाही तर त्यांना फोटो काढण्यासही मनाई करण्यात आली आहे. अमृतपाल सिंगवर पंजाबमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. अमृतपालवर अमृतसरमधील अजनाळा पोलीस स्टेशनवर हल्ला आणि पोलिसांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमृतपाल सिंगला दिब्रुगडहून विमानाने नवी दिल्लीत आणण्यात येणार आहे. तर रशीदला दिल्लीच्या तिहार जेलमध्ये आणलं जाणार आहे. लोकसभा अध्यक्षांच्या चेंबरमध्ये ते सदस्यत्वाची शपथ घेतील. शपथविधी समारंभात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या परवानगीशिवाय दोघांचाही फोटो काढता येणार नाही. अमृतपालला फक्त आई-वडील, भाऊ आणि पत्नीला भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. अमृतपालला पंजाबमध्ये जाण्यास मनाई आहे. अमृतपालला या अटीवर पॅरोल देण्यात आला आहे की, तो कोणतेही राजकीय वक्तव्य करणार नाही आणि त्याचा व्हिडिओ बनवता येणार नाही आणि त्याचे फोटो ही काढता येणार नाही.

गेल्या वर्षी 23 एप्रिल रोजी अमृतसर येथून अमृतपाल सिंगला अटक करण्यात आली होती. तर रशीद यांच्या नेतृत्वाखालील एआयपीचे सरचिटणीस प्रिन्स परवेझ शाह यांनी सांगितले की, केवळ रशीदच्या कुटुंबीयांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची परवानगी होती. रशीदची मुले अबरार आणि असरार, ज्यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती, तेही दिल्लीत आहेत.