चेन्नई : तामिळनाडूच्या विरुधुनगर येथे एका फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात 11 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या स्फोटामुळे कारखान्यात भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. या घटनेत आतापर्यंत 36 जण जखमी झाले आहेत. पोलिसांच्या मते, आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास हा स्फोट झाला (Tamil Nadu fire at firecracker factory in virudhunagar).
दरम्यान, या घटनेत जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांना 3 लाखांची आर्थिक मदत करणार असल्याची घोषणा तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीसामी यांनी केली आहे. त्याचबरोबर जखमींना प्रत्येकी 1 लाखांचे आर्थिक साहाय्य दिलं जाणार आहे.
या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी मृतकांच्या कुटुंबियांना 2 लाखांची मदत देणार असल्याची घोषणा केली आहे. तर जखमींना 50 हजारांची मदत करणार असल्याचं म्हटलं आहे.
“तामिळनाडूच्या विरुधुनगर येथे फटाक्यांच्या कारखान्यात आग लागल्याची घटना दुखद आहे. या दुखद समयी पीडित परिवारांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी लोक बरे होतील, अशी मला आशा आहे. घटनास्थळी सध्या बचावकार्य सुरु आहे”, असं पंतप्रधान मोदी ट्विटरवर म्हणाले आहेत (Tamil Nadu fire at firecracker factory in virudhunagar).
An ex-gratia of Rs. 2 lakh each has been approved from PMNRF for the next of kin of those who have lost their lives due to a fire in Virudhunagar, Tamil Nadu. Rs. 50,000 would be given to those seriously injured.
— PMO India (@PMOIndia) February 12, 2021
दरम्यान, या घटनेप्रकरणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीदेखील ट्विट करत दु:ख व्यक्त केलं आहे. “तामिळनाडूच्या विरुधुनगर येथील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटातील पीडितांच्याप्रती माझ्या संवेदना आहेत. कारखान्यात अडकलेल्या लोकांबाबत विचार करुन खूप दुखी आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे, त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन करुन लवकरात लवकर पीडितांना बाहेर काढावं”, असं राहुल गांधी ट्विटरवर म्हणाले.
Heartfelt condolences to the victims of the firecracker factory fire in Virudhunagar, Tamil Nadu.
It’s heart wrenching to think of those still trapped inside.I appeal to the state government to provide immediate rescue, support & relief.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 12, 2021
हेही वाचा : मोठी बातमी: भुसावळमध्ये जयंत पाटलांच्या गाड्यांचा ताफा अडवला; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याविरोधात रोष