चेन्नई : तामिळनाडूत एका पोलीस अधिकारी महिलेचा मृत्यू झाला. मात्र, जवळपास 20 दिवस या महिलेचा मृतदेह घरातच पडून होता. या महिलेच्या घरात तिचे दोन लहान मुलं होती. मात्र, या मुलांनी कुणालाच याबाबत माहिती दिली. कारण या मुलांना एका मांत्रिकाने परमेश्वर त्यांच्या आईची आत्मा परत करेल. त्यानंतर त्यांची आई पुन्हा जिवंत होईल, असं सांगितलं होतं. तामिळनाडूच्या डिंडीगुल भागात ही धक्कादायक घटना समोर आली (Tamilnadu Dindigul head constable woman death).
संबंधित महिलेचे नाव इंदिरा असं होतं. ती डिंडिगुल पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होती. तिला किडनीशी संबंधित आजार होता. काही वर्षांपूर्वी तिचं पतीसोबत भांडण झाल्याने ती आपल्या मुलांना घेऊन वेगळं राहत होती. तिला एक 13 वर्षाचा मुलगा तर 9 वर्षांची मुलगी आहे. ती एकटीच या मुलांचं पालनपोषण करत होती (Tamilnadu Dindigul head constable woman death).
इंदिरा गेल्या कित्येक दिवसांपासून किडनीशी संबंधित आजाराने त्रस्त होती. या आजारामुळे तिने स्वेच्छा निवृत्तीसाठी पोलीस विभागाला निवेदन दिलं होतं. ती गेल्या काही दिवसांपासून पोलीस ठाण्यात जात नव्हती. त्यामुळे तिच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी तिची एक सहकारी महिला कॉन्स्टेबल तिच्या घरी पोहोचली. यावेळी तिला घरात इंदिराचे दोन्ही मुलं भेटले. घरात प्रचंड दुर्गंध येत होता. यावेळी तिने मुलांना इंदिराविषयी विचारलं. मुलांनी आपली आई आत झोपली असून तिला उठवू नका, नाहीतरी परमेश्वर आईला त्रास देईल, असं सांगितलं.
महिला कॉन्स्टेबलला मुलांच्या बोलण्यावरुन संशय आला. तिने तातडीने पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. पोलीस तातडीने इंदिराच्या घरी पोहोचले. यावेळी इंदिराचा मृत्यू झाला आहे, ही माहिती समोर आली.
पोलिसांना इंदिराच्या मृतदेहाच्या आजूबाजूला पुजेचं साहित्य मिळालं. यावेळी मुलांनी पोलिसांना आपल्या आईला त्रास देऊ नका. ती फक्त झोपली आहे, असं सांगितलं. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासात इंदिराचा 20 दिवसांपूर्वीच म्हणजे 7 डिसेंबरलाच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. मांत्रिकाने इंदिराच्या मुलांना आणि बहिणीला तिला रुग्णालयात घेऊन गेल्यास परमेश्वर इंदिराची सुरक्षा करणार नाही, अशी खोटी माहिती दिली होती. त्यामुळे इंदिराचा मृतदेह घरात 20 दिवस पडून राहिला. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित मांत्रिकाला आणि इंदिराच्या बहिणीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.