उदयपूर– शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मारहाणीचे प्रकार राजस्थानात (Rajasthan)थांबताना दिसत नाहीयेत. जालौरमध्ये (jalore)शिक्षकाने केलेल्या जबर मारहाणीत एका 9 वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता दुसरा प्रकार घडला आहे. उदयपूरमध्ये एका खासगी शाळेतील शिक्षकाने एका विद्यार्थ्याला एवढी जबर मारहाण केली आहे की, त्याचे दातच तुटले (teacher broke teeth)आहेत. या विद्यार्थ्याची चूक इतकीच होती ती, त्याने शिक्षकांनी दुसऱ्या मुलाला प्रश्न विचारलेला असताना, स्वत:च उत्तर दिले होते. त्यामुळे राग आलेल्या शिक्षकांनी या मुलाचे डोके टेबलावर आपटले. यात त्या मुलाचे दातच तुटले आहेत.
यानंतर संतापलेल्या पालकांनी या शिक्षकाच्याविरोधात पोलिसांत एफआयआर दाखल केली आहे. उदयपूरच्या कडलवास औद्योगिक क्षेत्रात माऊंट लिट्रा नावाची ही शाळा आहे. या विद्यार्थ्याचे वडील भरत नंदावत यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ही तक्रार केली आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, त्यांचा 14 वर्षांचा मुलगा सम्यक नंदावत हा माऊंट लिट्रा शाळेत शिकतो. गुरुवारी त्याचे हिंदीचे शिक्षक कमलेश वैषणव हे वर्गात प्रश्न विचारीत होते. शिक्षकांनी दुसऱ्या एका मुलाला प्रश्न विचारला होता, मात्र सम्यक याने अनावधनाने त्या प्रश्नाचे उत्तर दिले. त्यामुळे शिक्षकांना एवढा राग आला की, त्यांनी सम्यकचे डोके टेबलावर आपटले. यात सम्यकचे समोरचे दात तुटले आहेत. मुलाने घरी आल्यानंतर हा सगळा प्रकार आई वडिलांना सांगितला.
याबाबत शाळेच्या व्यवस्थापकांची वेगळीच भूमिका आहे. त्यांनी सांगितले आहे की, ही एक दुर्घटना आहे. हा मुलगा घाबरुन बसत असताना त्याचे डोके टेबलावर आपटले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीसीटीव्ही तपासणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. जर त्यात शिक्षकाची चूक असेल तर त्याला निलंबित करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.