महाराष्ट्रातील अनेक शहरांचे तापमान 40 अंश सेल्सियसवर गेले आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील तापमान 45 अंश सेल्यियसवर पोहचले आहे. त्यानंतर या भागातील जिल्ह्याधिकाऱ्यांनी जमावबंदी लागू केली आहे. परंतु राजस्थानमधील फलोदी या शहराचे तापमान 50 अंश सेल्सियस गेले आहे. या परिसरात गेल्या 72 तासांत उष्मघातामुळे 24 जणांचा मृत्यू झाला आहे. राजस्थानमध्ये गेल्या आठड्यापासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे.
जोधपूर जिल्ह्यामधील फलोदी शहराचे तापमान 50°C गेला आहे. या महिन्यात तिसऱ्यांदा तापमानाने उच्चांक गाठला आहे. यापूर्वी १९ मे २०१६ रोजी शहराचे तापमान 51°C गेले होते. ते देशातील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान होते. त्यानंतर 18 मे 2016 रोजी 50.5°C नोंदवण्यात आले होते. राजस्थानमधील जैसलमेरमधील तापमान 48 डिग्री सेल्सियस होते तर बीकानेरमधील तापमान 47.2 डिग्री सेल्सियसवर जाऊन पोहचले. चुरू 47 डिग्री सेल्सियस, जोधपूर 46.9 डिग्री सेल्सियस, गंगानगर 46.5 डिग्री सेल्सियस, कोटा 46.3 डिग्री सेल्सियस आणि जयपूरचे तापमान 43.8 डिग्री सेल्सियस होते.
आयएमडीचे महानिदेशक एम. महापात्र यांनी म्हटले की, हवेची दिशा बदलल्यामुळे तापमान प्रचंड प्रमाणात वाढले आहे. तसेच जमिनीवरून वाहणारे अत्यंत कोरडे, उष्ण वारे ईशान्य भारतावर परिणाम करत आहेत. वाऱ्याच्या दिशेत झालेला बदल हे प्रामुख्याने आखाती भागात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे आहे. चक्रीवादळ पोहचल्यानंतर ईशान्य भारताला रविवारपासून दिलासा मिळणार आहे.
राज्यात विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात तापमान प्रचंड वाढले आहे. या भागातील अनेक जिल्ह्यांत तापमानाचा पार हा 45 अंश सेल्सिअस पोहोचला आहे. त्याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. उन्हाचा तडाका हा जिल्ह्यात वाढला असून त्याचा फटका आता वीज वितरण कंपनीला देखील बसला आहे. वीज केंद्राचे ट्रान्सफार्मरला थंड ठेवण्यासाठी कुलर आणि पंख्यांच्या मदत घेतली जात आहे.
राज्यात उकाड्याने हैरान झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. येत्या 27 ते 29 मे दरम्यान हलका पाऊस मेघगर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली जात आहे. रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण असून हवामान खात्याने ठाणे, मुंबईसह रायगडच्या काही भागात 27 ते 29 मे दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. मात्र जून महिन्याच्या आधी मान्सूनपूर्व पाऊस होणार असल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.