नवी दिल्ली : देशभरात 75 वा स्वातंत्र्य दिन (Independence Day) साजरा करण्याची जय्यत तयारी सध्या सुरु आहे. राजधानी दिल्लीतही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी तयारी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच सुरक्षा यंत्रणा (Investigative Agency) हाय अलर्टवर आहेत. सुरक्षा यंत्रणांनी 15 ऑगस्टपूर्वी दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट दिलाय. सुरक्षा यंत्रणांच्या हवाल्यानं असं सांगितलं जात आहे की राजधानी दिल्लीत आयईडी किंवा ड्रोन हल्ला होण्याची शक्यता आहे. दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमध्ये (Pakistan Occupied Kashmir) ड्रोनद्वारे हल्ल्याचा अभ्यास करत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिल्याचे मीडिया रिपोर्ट्स आहेत. इतकंच नाही तर दहशतवादी मेटल डिटेक्टरला चकवा देणाऱ्या आयईडीच्या वापराने मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत.
स्वातंत्र्य दिनानिमित्त सुरक्षा यंत्रणांनी दहशवादी हल्ल्याचा अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. दहशतवादी हल्ल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांना अनेक प्रकारच्या हल्ल्यापासून सावध साहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय स्तरावरील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला इशारा हा ड्रोन हल्ल्याचा आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ड्रोन हल्ल्याचं पशिक्षण घेत असल्याचं या अलर्टमध्ये सांगण्यात आलंय.
दहशतवादी हल्ल्याच्या अलर्टनुसार दहशतवादी यावेळी मेटल डिटेक्टरला चकवा देणाऱ्या सोफेस्टिकेटेड आयईडीचा वापर करण्याची शक्यता आहे. या अलर्टमुळे आता सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. दिल्ली पोलिसांकडून सर्वच ठिकाणी चेकिंग करण्यात येत आहे. तसंच दिल्लीच्या रस्त्यांवर नाकाबंदीही वाढवण्यात आली आहे.
गुप्तचर विभागाने दिलेल्या अलर्टनुसार सुरक्षा यंत्रणांनी कोणत्याही संशयास्पद गोष्टीची अत्यंत काळजीपूर्वक चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. या अलर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, संशयित वस्तू बॉम्ब असली तरी तो निकामी करण्यासाठी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. कारण अत्याधुनिक आयईडी मेटल डिटेक्टरलाही चकमा देऊ शकतात. त्यामुळे मेटल डिटेक्टरवर तैनात असलेल्या पोलिसांना अत्यंत सावधपणे आणि सतर्कतेनं तपासाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.