दहशतवाद्याच्या भावाला मतदारांनी नाकारलं, पाहा अफजल गुरुच्या भावाला किती मते पडली

| Updated on: Oct 09, 2024 | 5:33 PM

जम्मू-काश्मीर निवडणुकीत भाजपला २९ जागा मिळाल्या तर एनसी-काँग्रेसला ४९ जागा मिळाल्या आहेत. दहशतवादी हल्ल्यातील दोषी अफजल गुरूच्या भावाने सोपोर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण त्याला जनतेने स्पष्टपणे नाकारले आहे. त्याला नोटा पेक्षा ही कमी मते पडली.

दहशतवाद्याच्या भावाला मतदारांनी नाकारलं, पाहा अफजल गुरुच्या भावाला किती मते पडली
Follow us on

जम्मू-काश्मीरच्या जनतेने फुटीरतावादी उमेदवारांना चपराक लगावली आहे. जनतेने त्यांना पूर्णपणे नाकारले आहे. 2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या अफझल गुरूचा भाऊ एजाज अहमद गुरूला देखील जनतेने नाकारले आहे.  एजाज अहमद यांनी सोपोर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली. ज्यात त्यांना फक्त 129 मते मिळाली. ही मते NOTA ला मिळालेल्या मतांपेक्षा कमी आहे. या मतदारसंघातून नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार इर्शाद रसूल कार विजयी झाले आहेत.

एजाज अहमद यांनी सोपोरमधून अपक्ष अर्ज दाखल केला होता. डिसेंबर 2001 मध्ये लोकसभेवर हल्ला करण्याचा कट रचल्याप्रकरणी एजाजचा भाऊ अफजल गुरु याला 9 फेब्रुवारी 2013 रोजी दिल्लीच्या तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली होती. सोपोरमधून विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या त्याच्या भावाला मतदारांनी पराभूत केले आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे इर्शाद रसूल कार यांनी या जागेवर विजय मिळवला आहे. त्यांना 26,975 मते मिळाली. इर्शाद रसूल यांनी अपक्ष उमेदवार मुरसलीन अझीर यांचा ६६१९ मतांनी पराभव केला. काँग्रेसचे अब्दुल रशीद दार तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना एकूण 5167 मते मिळाली. सोपोरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपीचे उमेदवार इरफान अली लोन यांना केवळ 1687 मते मिळाली. एजाज अहमद गुरू यांना केवळ 129 मते मिळाली. NOTA ला त्यापेक्षा जास्त मते मिळाली. येथे NOTA ला 341 मते मिळाली आहेत.

2014 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या निवडणुकीत सोपोरने काँग्रेस नेते हाजी रशीद यांची आमदार म्हणून निवड केली होती. या निवडणुकीत रशीद दार तिसऱ्या क्रमांकावर राहिले. इंजिनिअर रशीद यांच्या अवामी इत्तेहाद पक्षाने (एआयपी) 44 उमेदवार उभे केले होते, परंतु त्यापैकी बहुतेकांना त्यांचं डिपॉझिटही वाचवता आलेले नाही. जमात-ए-इस्लामीने एकूण चार उमेदवार उभे केले होते आणि इतर चार जणांना पाठिंबा दिला होता. मात्र कुलगाममधील सय्यर अहमद रेशीच काही ओळख निर्माण करू शकले. इतर सर्व उमेदवारांचा दारुण पराभव झाला.

नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेसचा विजय झाला

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. राज्यात NC-काँग्रेसचा विजय झाला आहे. सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेला बहुमताचा टप्पा त्यांनी ओलांडला आहे. निवडणुकीत एनसी-काँग्रेसला 49, भाजपला 29, पीडीपीला 3 आणि इतरांना 9 जागा मिळाल्या आहेत.