मुंबई – राज्यात मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार संकटात सापडलेले दिसते आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)राजीनामा देण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विटर अकाऊंटवरुन, त्यांचे मंत्रिपद हटवले आहे. दिलासा देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेते परिस्थिती निवळेल असा विश्वास व्यक्त करीत आहेत. मात्र सध्याच्या स्थितीत राजकीय फासे हे मविआ सरकारच्या (MVA Government)विरोधात असल्याचे दिसते आहे. नुकत्यात राज्यात झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांत महाविकास आघाडीतील अंतर्गत कलह स्पष्टपणे दिसले आहेत. राज्यसभेत भाजपाने ११३ च्या ऐवजी १२३ तर विधानपरिषदेत १३४ मते मिळवण्यात यश मिळवले आहे. यातून भाजपाने विजय तर मिळवलाच आहे, पण त्याचबरोबर मविआत सगळं काही आलबेल नसल्याचंही दाखवून दिलं आहे. एकनाथ शिंदे यांची बंडखोरी त्यानंतर झाली आहे. बंडखोरीसाठी ही वेळ निवडण्यात आली असली, तरी हे सगळं आत्ताच सुरु झालेलं नाही. त्याची कारणे गेल्या अडीच वर्षांपासून धुमसत होती. त्याच काही कारणांचा हा वेध
एकनाथ शिंदे बंडखोरी करण्याच्या निर्णयापर्यंत का आले, याची पाळेमुळे अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकारचे स्थापन झाले त्या वेळेपासूनची आहेत. २०१९ साली शिवसेना-भाजपाने एकत्र निवडणुका लढवल्यानंतर, युतीचेच राज्य यावे, अशी एकनाथ शिंदे यांची इच्छा होती. जेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय उद्धव यांनी घेतला तेव्हाही एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा होती. मात्र त्यांना डावलण्यात आले आणि ऐनवेळी उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून एकनाथ शिंदेंच्या मनात खदखद होती.
आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते होते. मात्र आदित्य ठाकरे यांच्याशी त्यांचे अनेक विषयांवर वाद होते. त्यांच्या मंत्रालयात आदित्य ठाकरे यांच्या हस्तक्षेपाबाबत शिंदे नाराज असल्याची माहिती होती. इतकंच नाही तर एमएसआरडीसीच्या अनेक योजनांत आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारने किंवा त्यांचा चेहरा वापरण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने नाराजी वाढली होती.
एकनाथ शिंदे यांचे नगरविकास खाते आदित्य ठाकरेंकडे लवकरच जाण्याची शक्यता होती. महापालिका आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीर हा निर्णय होईल, अशी चर्चा होती. सुभाष देसाई निवृत्त झाल्याने त्यांचे उद्योग खाते शिंदेंकडे जाणार अशीही चर्चा सुरु होती. त्यामुळे एकनाथ शिंदे दुखावले गेले होते, असे सांगण्यात येते आहे.
शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आईचे दूध विकणारा नराधम, शिवसेनेत नको, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले होते. राज्यसभेत कोणतं मत फुटलं, कुणी कलाकाऱ्या केल्या, हे कळलेलं आहे, हळूहळू हे कळेल, असेही ते म्हणाले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज झाल्याची चर्चा होती. त्यानंतरच त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते आहे.
एकनाथ शिंदे हे जरी बंडानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्व आणि विकासाचा मुद्दा सांगत असले, तरी प्रत्यक्षात शिवसेनेत त्यांना जी वागणूक देण्यात येत होती, तेच या बंडामागचे कारण असल्याचे मानण्यात येते आहे. नगरविकास मंत्रालय काढून घेतल्याने त्यांना अधिक अपमानजनक वाटले असते, त्यामुळेच त्यांनी बंड करण्याचा निर्णय घेतला असे मानण्यात येते आहे.