नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. TMC अध्यक्षा ममता बॅनर्जी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यानंतर आता आणखी एका मुख्यमंत्र्यांने काँग्रेसला मोठा झटका देण्याची तयारी केली आहे. इंडिया आघाडीतील महत्त्वाचे नेते आणि मुख्यमंत्री नितीश कुमार हे देखील यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. ते लवकरच भाजपच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीत सहभागी होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार यांच्याबाबत दिल्लीतून देखील हिरवा कंदील मिळाला आहे. बिहारचे भाजपचे नेते सुशील मोदी यांना दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांनी भेटीसाठी बोलवले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेत्यांमध्ये याबाबत चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यात देखील याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. नितीश कुमार यांना एनडीएमध्ये घेण्यासाठी आता मंजुरी मिळाल्याची माहिती येत आहे. अशा परिस्थितीत आता बिहार विधानसभा बरखास्त होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने आपल्या सर्व आमदारांना पाटण्यात बोलावले आहे.
नितीश कुमार यांच्या या निर्णयाने काँग्रेस सह लालूप्रसाद यादव यांना देखील धक्का बसणार आहे. लालू यादव यांनी नितीश कुमार यांच्याशी फोनवर चर्चा केल्याचं देखील बोललं जात आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही नितीशकुमार यांच्याशी संपर्क साधत आहेत.
लालू प्रसाद यादव कुटुंबीयांवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी निशाणा साधला होता. लालूंचा पक्ष राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आणि नितीश कुमार यांचा पक्ष जनता दल युनायटेड (जेडीयू) यांच्यातील तणाव वाढू लागला आहे. विरोधी पक्षांच्या महाआघाडीतील (इंडिया अलायन्स) तणावाचा परिणाम नितीश कुमार यांच्या 25 जानेवारीला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही दिसून आला. लवकरच बैठक संपली आणि नंतर पत्रकार परिषदही रद्द करण्यात आली.
परिवारवादावर टीका करताना नितीशकुमार यांनी अप्रत्यक्षपणे लालू कुटुंबावर निशाणा साधला होता. ते म्हणाले, “आजकाल लोक त्यांच्या कुटुंबाला पुढे नेतात, पण कर्पूरीजींनी असे कधीच केले नाही. जननायक यांच्याकडून शिकून आम्हीही आमच्या कुटुंबाला कधीच पुढे नेले नाही. कर्पूरीजी गेल्यानंतर आम्ही त्यांचा मुलगा रामनाथ ठाकूर यांना पुढे नेले.
बिहारमधील राजकीय गदारोळात लालूंची मुलगी रोहिणी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नितीश कुमारांना प्रत्युत्तर दिले होते. रोहिणीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एकामागून एक तीन पोस्ट केल्या. त्यांनी लिहिले – “जो समाजवादी नेता असल्याचा दावा करतो तोच वाऱ्याप्रमाणे बदलत्या विचारसरणीचा आहे.” पण नंतर रोहिणी यांनी सर्व पोस्ट डिलीट केल्या होत्या.
RJD आणि काँग्रेस व्यतिरिक्त, बिहारच्या महाआघाडीत CPI(ML), CPM आणि CMI यांचा समावेश आहे. बिहार विधानसभेत एकूण 243 जागा आहेत.
बिहार विधानसभेत राष्ट्रीय जनता दलाच्या 79, भारतीय जनता पक्षाच्या 77, जनता दल युनायटेडच्या 45, काँग्रेसच्या 19, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (एमएल) 12, एआयएमआयएमच्या 1, हिंदुस्थानी पक्षाच्या 4 जागा आहेत. अवाम मोर्चा (HAM), भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) 2 आमदार, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 2 आणि एक अपक्ष आमदार आहे.