हैदराबाद – देशातील पुढची 30ते 40 वर्ष ही भाजपाचीच (BJP)आहेत आणि या काळात देश विश्वगुरु होईल, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शाहा (Amit Shah) यांनी विश्वास व्यक्त केला आहे. देशातील राजकारणाला जातीयवाद, वंशवाद आणि तुष्टीकरण यांचा अभिशाप आहे, भाजपाच्या सरकारच्या काळात या सगळ्यांचा अंत होईल, असेही अमित शाहा म्हणाले आहेत. येत्या काळात तेलंगणा आणि प. बंगालमध्येही भाजपाचेच सरकार (government in 5 states)असेल, असे सूतोवाचही त्यांनी केले आहे. या दोन्ही राज्यात घराणेशाही असलेल्या पक्षांचा दबदबा संपेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे. भारतीय जनता पार्टी केरळ, आंध्रप्रदेश आणि ओडिशातही सरकार गठित करण्यासाठी तयारी करत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. हैदराबादमध्ये होत असलेल्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ते बोलत होते.
सध्या केंद्रातील योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक थरापर्यंत गेला आहे. त्यामुळे काँग्रेस हताश आणि निराश असल्याचे त्यांनी सांगितले आहे. केंद्र सरकारच्या प्रत्येक कल्याणाकारी योजनेचा काँग्रेस विरोध करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. सर्जिकल स्ट्राईक, एयर स्ट्राईक किंवा ३७० कलम हटवणे या सगळ्यांचा विरोध करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. कोरोनाच्या विरोधात देशात मोठे लसीकरण अभियान चालवण्यात आले त्याच्यावरही काँग्रेसने प्रश्न उपस्थित केल्याचे ते म्हणाले. सध्या देशात विरोधक विखुरलेले आहेत आणि काँग्रेसला मोदी फोबिया झाल्याने ते अध्यक्ष निवडत नसल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
गुजरात दंगलीबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल हा ऐतिहासिक असल्याचे ते म्हणाले. सुप्रीम कोर्टाने आरोपांना खोटे ठरवले आहे आणि राजकारणाने हे आरोप प्रेरित असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घटनेवर विश्वास ठेवला. गुजरात दंगल प्रकरणात एसआयटीला सामोरे गेले. मात्र दुसरीकडे भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरे जाण्याएवजी विरोधक अराजकता पसरवीत आहेत, असा आरोपही शाहा यांनी केला.
या बैठकीत तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यावर शाहा यांनी जोरदार टीका केली आहे. केसीआर यांच्या सरकारची सूत्रे ही ओवेसींच्या हातात असल्याचे शाहा म्हणाले. केसीआर हे ओवेसींना घाबरत असलव्याचेही त्यांनी सांगितले. केसीआर यांना जनतेशी काहीही देणेघेणे नाही, त्यांना फक्त स्वताच्या मुलाला मुख्यमंत्री करायचे आहे, असेही अमित शाहा म्हणाले. जे मुख्यमंत्री मंत्रालयात जात नाहीत त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचेही शाहांनी म्हटले आहे. केसीआर मंत्रालयात जात नाहीत, कारण त्यांना एका तांत्रिकाने सांगितले आहे की, तुम्ही मंत्रालयात गेलात तर सरकार पडेल. केसीआर यांची अडचण लवकरच दूर होईल असा विश्वासही शाहांनी व्यक्त केला आहे.