Rajasthan Election Result : 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल येण्यास आता काही तास उरले आहेत. पण त्याआधी आलेल्या एक्झिट पोलमुळे सर्वच पक्षाच्या नेत्यांची झोप उडाली आहे. एक्झिट पोलमध्ये कांटे की टक्कर दिसत आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवारांचा भाव वाढला आहे. राजस्थानमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये कांटे की टक्कर आहे. त्यामुळे आता सर्वच नेते निकालाआधी एक्टिव्ह झाले आहेत. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या देखील सक्रिय झाल्या आहेत. नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. अपक्ष उमेदवारांना आपल्याकडे खेचण्यासाठी आतापासूनच त्यांना संपर्क केला जात आहे.
विधानसभा निवडणुकीचे निकाल ३ डिसेंबरला जाहीर होणार आहेत. पण त्याआधी जर बहुमतासाठी काही अपक्ष उमेदवारांची मदत लागली तर आतापासूनच त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.
जयपूरमध्ये वसुंधरा राजे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही बैठक घेतली. सकाळी वसुंधरा राजे यांनी मोतीडुंगरी गणेश मंदिराला भेट दिली. त्यांनी प्रार्थना केली आणि गणपतीचे आशीर्वाद घेतले.
राजस्थान अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या उमेदवार जर निवडून आले तर त्यांची मनधरणी करण्याची जबाबदारी खुद्द राजे यांच्यावर येऊ शकते.
दुसरीकडे काँग्रेसमध्ये देखील बंडखोरी झाली होती. बंडखोरी करुन अपक्ष निवडणूक लढवणारे ५ उमेदवार हे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या जवळचे आहेत. तर माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या जवळचे ५ अपक्ष उमेदवार आहेत.
राजस्थान विधानसभा निवडणुकीचे निकाल रविवारी जाहीर होणार आहेत. बहुतांश एक्झिट पोलने राज्यात भाजप सरकार स्थापन करण्याची शक्यता वर्तवली आहे. पण काही चॅनेलने काँग्रेस आणि भाजपमध्ये कांटे की टक्कर असेल असं भाकित केले आहे. त्यामुळे वंसुधरा राजे सिंधिया आधीच एक्टिव्ह झाल्या आहेत.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि वसुंधरा राजे अपक्ष उमेदवार आणि बंडखोरांशी संपर्क साधण्यात व्यस्त आहेत. त्रिशंकू विधानसभा झाल्यास अपक्ष उमेदवारांचा भाव वाढणार आहे.