श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये दहशतवाद्यासोबत झालेल्या चकमकीत भारताचे तीन जवान शहीद झाले आहेत. भारतात घुसखोरी वाढवण्यासाठी POK जवळील लॉन्च पॅड हलवण्यात आल्याची माहिती आहे. लष्कर-ए-तैयबा (LeT), जैश-ए-मोहम्मद (JeM) आणि हिजबुल मुजाहिद्दीनचे दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत.
एलओसीवरुन दहशतवादी कारवायांसाठी घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवान नेहमीच हाणून पाडतात. एलओसीवर दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कराचा पाठिंबा असल्याशिवाय हे शक्य नाही. भारत-पाकिस्तानमधील युद्धविराम मोडण्यासाठी दहशतवादी संघटना प्रयत्न करत आहेत.
LOC च्या जवळ दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करता यावी यासाठी लॉन्चिग पॅड बनवण्यात आले आहेत. या ठिकाणी दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर गुरेझ, नीलम व्हॅली, तंगधर, उरी चकोटी, गुलमर्ग, पूंछ, राजौरी, नौशेरा आणि सुंदरबनी सेक्टरमधून घुसखोरीचा प्रयत्न केला जातो. हिवाळ्याआधीत ते येथून निघून भारतात येण्याचा प्रयत्न करतात.
भारतीय गुप्तचर विभागाच्या हवाल्यातून असे स्पष्ट झाले की, पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना पाकिस्तानी लष्करावर युद्धविराम तोडण्यासाठी दबाव आणत आहेत. कारण यामुळे त्यांना भारतात घुसखोरी करणं शक्य होते.
भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तान देखील अलर्टवर असतो. कधी भारताकडून कारवाई होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे त्यांनी सर्व लॉन्चिंग पॅड एलओसीजवळ हलवले आहेत.
उरी सेक्टरमध्ये १८ सप्टेंबर २०१६ ला दहशतवादी हल्ला झाला होता. ज्यामध्ये अनेक जवान शहीद झाले होते. त्यानंतर २९ सप्टेंबर २०१६ रोजी भारताने पीओकेमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केला होता. यावेळी अनेक दहशतवादी मारले गेले होते. त्यानंतर भारताने एअरस्ट्राईक केला. आता पुन्हा एकदा पाकिस्तानला स्ट्राईकची भीती सतावते आहे.