लखनऊ | 12 ऑक्टोबर 2023 : एकीकडे अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम वेगाने सुरु असताना आता अयोध्येच्या धन्नीपूर गावात देशातील सर्वात भव्य मशिदीचे काम देखील सुरु होत आहे. श्रीराम जन्मभूमी वादावर सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मुस्लीम पक्षाला 5 एकर जमीन देण्याचा निर्णय झाला होता. या जागेवर बांधल्या जाणाऱ्या मशिदीची रुपरेषा आणि नाव आज होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार आहे. या बैठकी मुस्लीम समाजातील नेते आणि सुन्नी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष देखील सामील होणार आहेत.
अयोध्येतील प्रस्थावित मशिदीच्या बांधकामासंदर्भात मुंबईच्या रंगशारदा हॉल येथे आज गुरुवारी एक बैठक सुरु आहे. ही बैठक हाजी अराफत शेख यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. या बैठकीला सुन्नी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष जुफर फारुकी देखील उपस्थित आहेत. या बैठकीत मोठ्या संख्येने मौलाना आणि उलेमा हजर राहले आहेत. या बैठकीत उत्तर प्रदेशातील अनेक मोठे मौलाना आणि धार्मिक नेते उपस्थित आहेत.
मुंबईतील या बैठकीनंतर अयोध्येत होणाऱ्या मशिदीचे पहिली झलक, पहिले रेखाचित्र समोर येणार आहे. या बैठकीत ही मशिद कशी असेल त्याची रुपरेषा समोर येण्याची शक्यता आहे. मशिद उभारण्यासाठी मुंबईतून पहिली विट देखील नेण्यात येणार आहे. धन्नीपूर हे गाव अयोध्येच्या श्रीराम मंदिरापासून 25 किलोमीटर लांब आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येतील राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आहे. परंतू मशिदीचे काम काही अजूनही सुरु झालेले नाही. सर्वोच्च न्यायालयाने पाच एकर जमीन यासाठी दिल्यानंतरही कामाला गती आली नव्हती. मुस्लीम नेते आणि धर्मगुरु यांच्यात यावरुन एकमत होत नसल्याने त्यासाठी वेळ लागल्याचे म्हटले जात आहे. आता आजच्या बैठकीनंतर या मशिदीचे काम सुरु होईल असे म्हटले जात आहे.