First Railway Station : भारतात रेल्वेचं जाळं इतकं मोठं आहे की, त्यामुळे शहरं जवळ आली आहेत. पण तुम्हाला वाटत असेल की देशातील प्रत्येक राज्यात रेल्वे पोहोचली आहे. पण असे नाही. असं एक राज्य आहे जिथे अजूनही रेल्वे पोहोचलेली नाही. आता पंतप्रधान मोदी यांनी आज येथे राज्यातील पहिल्या रेल्वे स्टेशनची पायभरणी केली आहे. भारतात इंग्रजांच्या काळातच रेल्वे सुरु झाली होती. पण आज इतके वर्ष झाले तरी भारताच्या या राज्यात रेल्वे पोहोचली नव्हती. कोणतं आहे ते राज्य जाणून घेऊयात.
भारताच्या नकाशावर असलेलं सुंदर राज्य म्हणजे सिक्कीम. मात्र येथे रेल्वे अद्याप पोहोचलेली नाही. सिक्कीम हे राज्य 16 मे 1975 रोजी भारताचा भाग बनले. राजेशाही संपल्यानंतर देशातील 22 वे राज्य बनले.
आता सिक्कीमला जाणाऱ्या लोकांना लवकरच रेल्वेने येथे येता येणार आहे. याआधी ही सुविधा येथे नव्हती. कारण येथील उंच उंच पर्वतांमुळे ते शक्य होत नाही. डोंगराळ भागात अनेक बोगदे बांधावे लागतात. हे काम तितके सोपे नाही. पण आता अखेर येथे रेल्वे पोहोचणार आहे.
पर्यटनाच्या बाबतीत हे राज्य महत्त्वाचे आहे. सीमेवर हे राज्य असल्याने येथे रंगपो स्टेशन हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. सिक्कीममध्ये कोणताही रेल्वे मार्ग नाही. पण आता सरकारने तीन टप्प्यांत येथे रेल्वे आणण्याची तयारी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात सेवोक ते रंगपो रेल्वे प्रकल्प होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात रांगपो ते गंगटोक आणि तिसऱ्या टप्प्यात गंगटोक ते नाथुला हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे.
ऑक्टोबर 2009 मध्ये शिवोक-रंगपो रेल्वे प्रकल्प सुरु झाला होता. आता येथे सिक्कीमचे पहिले रेल्वे स्टेशन बांधले जाणार आहे. या रेल्वे लाईन प्रकल्पाची लांबी सुमारे 45 किमी आहे जी पश्चिम बंगालमधील शिवोक ते सिक्कीममधील रंगपोला जोडते.
या मार्गावर एकूण पाच रेल्वे स्थानके असणार आहेत. ज्यामध्ये तीस्ता बाजार देखील असेल. तीस्ता बाजार हे भारतातील पहिले भूमिगत हॉल्ट स्टेशन असू शकते. या मार्गावरील उर्वरित चार ओपन क्रॉसिंग स्टेशन शिवोक, रेआंग, मेल्ली आणि रंगपो असतील.