अयोध्या : राम मंदिराच्या उद्घाटनानंतर आता अयोध्या देशातील सांस्कृतिक अर्थव्यवस्थेचे आणखी एक मॉडेल बनणार आहे. 22 जानेवारीला राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हे मंदिर पाहण्यासाठी आणि श्री रामांचे दर्शन घेण्यासाठी हजारो लोकं दररोज देश-विदेशातून मोठ्या संख्येने अयोध्येला पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे अयोध्येत पर्यटनाचा व्यवसाय वाढणार आहे. अनेक मोठ्या हॉटेल कंपन्या अयोध्येत आपल्या शाखा उघडणार आहेत. यामध्ये ताज, मॅरियट, जिंजर, ओबेरॉय, ट्रायडेंट आणि रॅडिसन यांचा समावेश आहे. याशिवाय अयोध्येत आणखी एक व्यवसाय सुरू आहे. तो म्हणजे होमस्टेचा व्यवसाय. या व्यवसायातून अयोध्येतील हजारो कुटुंबांना रोजगार मिळणार आहे.
अयोध्येत होमस्टे सुरू करण्यासाठी अनेकांनी अर्ज केले आहेत. अयोध्या विकास प्राधिकरण (ADA) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एका वर्षात 600 कुटुंबांनी होमस्टे प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी 464 जणांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली आहेत. यूपी सरकार स्थानिक लोकांना त्यांच्या घरात होमस्टे उघडण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. जेणेकरून ते त्यांच्या उपजीविकेचं साधन होऊ शकेल. रकारने होमस्टेला प्रोत्साहन दिले आहे. होमस्टेला कोणताही व्यावसायिक कर भरण्यापासून सूट दिली आहे.
इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, अयोध्येत श्री रामांच्या दर्शनसाठी दररोज एक लाख लोकं येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अयोध्येत पुढील वर्षापर्यंत किमान 1000 होमस्टे तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. अयोध्येतील वाढत्या पर्यटनामुळे शहराचे दरडोई उत्पन्न देखील वाढणार आहे. अयोध्येत कोणतेही मोठे उद्योग किंवा कारखाने नाहीत. त्यामुळे येथील स्थानिक लोकांना उत्पन्नाचे एक चांगले साधन मिळणार आहे. मंदिराच्या उद्घाटनानंतर, दररोज सुमारे 1,00,000 भाविक अयोध्येत येण्याची अपेक्षा आहे.
अयोध्येतील लोकं त्यांच्या घरांना होमस्टे मध्ये बदलू शकता. येथील स्थानिक लोकांनी यातून दररोज 1,500 ते 2,500 रुपये मिळू शकतात. अयोध्येच्या आजूबाजूच्या गावांमध्ये ‘व्हिलेज टुरिझम’ला देखील चालना दिली जात आहे. येथे मातीच्या घरात राहण्याची लोकांची इच्छा देखील पूर्ण केली जाणार आहे. यासाठी 18 जणांनी अर्ज केले असून त्यापैकी 2-3 जणांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. होमस्टेच्या माध्यमातून स्थानिक खाद्यपदार्थांनाही चालना मिळेल. यातून ही येथील स्थानिक लोकांना उत्पन्न मिळणार आहे.