PM Narenda Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येक सभेत सांगत असतात की, तिसऱ्या कार्यकाळात ते भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवणार आहेत. 2024 ते 2029 या काळात पुढचे सरकार स्थापन झाल्यास भारत सर्वात मोठ्या जीडीपीच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, ही मोदींची हमी आहे, असे ते म्हणत आहेत. सध्या, भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर आहे. 2014 मध्ये भारताची अर्थव्यवस्था ही 11 व्या क्रमांकावर होती. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गेल्या 10 वर्षात भारताने अर्थव्यवस्थेत 5 अंकांनी वर उडी घेतली आहे. अर्थव्यवस्थेच्या या वेगानं भारताचा दर्जा जगात वाढला आहे. जे पाश्चिमात्य देश कधी भारताला महत्त्व देत नव्हते ते देश आता भारतासोबत जुडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भारताची भविष्यातील वाटचाल पाहता सगळेच जण आता भारताचे कौतूक करु लागले आहेत.
संयुक्त राष्ट्र (UN) महासभेचे (UNGA) अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस हे भारताचे डिजिटलायझेशन पाहून थक्क झाले आहेत. डिजिटल इंडिया मोहिमेमुळे सर्वसामान्य भारतीयांचे जीवन इतके सोपे कसे होत आहे की कल्पना करणेही कठीण आहे असं ते म्हणाले. त्यांनी डिजिटल कार्यक्रमाचे कौतुक केले आणि सांगितले की यामुळे भारताला आर्थिक समावेशन आणि गरिबी कमी करण्यात खूप मदत झाली आहे. भारताच्या या यशाचा लाभ जगाने घ्यावा, असे ते म्हणाले.
UNGA च्या 78 व्या सत्राचे अध्यक्ष फ्रान्सिस म्हणाले, ‘सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की मी जेव्हापासून भारतातून परतलो तेव्हा जेव्हा मी भारताचा विचार करतो तेव्हा मला ‘अतुल्य भारत’ आठवतो. मी हे गांभीर्याने सांगतोय मी तिथे होतो तेव्हा मला ते जाणवले. ‘या संदर्भात मी ज्या विशिष्ट उदाहरणाचा उल्लेख करू शकतो ते म्हणजे भारतात डिजिटलायझेशनचा वापर.’ फ्रान्सिस यावर्षी 22 ते 26 जानेवारी दरम्यान भारताच्या अधिकृत दौऱ्यावर होते. ते म्हणाले की, संपूर्ण भारतात पायाभूत सुविधांमध्ये इतका पैसा गुंतवला जात आहे, जो स्वतःच्या डोळ्यांनी पाहणे खूप आनंददायी होते.
जगातील सर्वात शक्तिशाली देश अमेरिकेचे भारतातील राजदूत यांनी ही भारताचे कौतूक केले आहे. भारत हे जगाचे भविष्य आहे, असा विश्वास एरिक गार्सेटी यांनी व्यक्त केलाय. ‘तुम्हाला भविष्य पाहायचे असेल, अनुभवायचे असेल तर भारतात या. तुम्हाला भविष्यातील जगासाठी काम करायचे असेल तर तुम्ही भारतात या. येथे असणे हा एक विशेषाधिकार असल्याचं देखील गार्सेट्टी म्हणाले आहेत. राजधानी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
Looking forward to meeting with Prime Minister @NarendraModi in India!
— Elon Musk (@elonmusk) April 10, 2024
जगभर प्रसिद्ध असलेले उद्योगपती एलोन मस्क भारतात गुंतवणूक करण्यास खूप उत्सुक आहे. एलन मस्क यांनी आपल्या कार व्यवसायासाठी काही सवलती मागितल्या होत्या, पण भारत सरकारने स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर काही दिवस गप्प बसल्यानंतर मात्र आता त्यांना खात्री पटली आहे की, भारत ना विशेष वागणूक देणार ना दबावाखाली येणार, मग त्यांनी सर्व अटी व शर्तींसह आपला व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. मस्क यांनी बुधवारी आपल्या एक्स-पोस्टद्वारे सांगितले की, या महिन्यात ते भारतात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. मोदींची भेट घेतल्यानंतर मस्क भारतात त्यांची पहिली कार फॅक्टरी सुरू करण्याची घोषणा करू शकतात. गुजरात किंवा महाराष्ट्रात ते फॅक्टरी सुरु करु शकतात.
2014 मध्ये नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा भारताचा GDP $ 2,039.13 अब्ज होता. जो नंतर 4,112 अब्ज डॉलरपर्यंत वाढला. म्हणजे 10 वर्षात भारताच्या GDP मध्ये अतिरिक्त $2,072.87 अब्ज जोडले गेले आहेत, जे 10 वर्षांपूर्वीच्या GDP पेक्षा जास्त आहे. एकूणच, मोदींच्या राजवटीत भारताचा GDP 101.65% ने दुपटीने वाढला आहे.