इंफाळ : मणिपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड हिंसा भडकली आहे. सर्वत्र जाळपोळ सुरू आहे. कुकी, नागा आणि मैतेई समुदायात ही हिंसा भडकली आहे. अनेक घरांना पेटवून दिलं जात आहे. शेकडो वाहने भररस्त्यात जाळून टाकली आहेत. या हिंसाचारात आतापर्यंत 54 लोकांचा मृत्यू झाला आहे. शेकडो जखमी झाले आहेत. लोक घर सोडून बाहेर पळताना दिसत आहेत. काही लोकांनी नागरी निवाऱ्यात आश्रय घेतला आहे. तर आपल्या घराची राखरांगोळी होऊ नये म्हणून मणिपूरमधील लोक आता घराबाहेर आपल्या जातीचा उल्लेख करत आहेत.
राज्याची राजधानी असलेल्या इंफाळमध्ये प्रचंड हिंसा भडकलेली आहे. इंफाळमध्ये दहशतीचं वातावरण आहे. पश्चिमी इंफाळमध्ये सातत्याने हिंसा होत असल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पश्चिम इंफाळमधील अनेक गावात शुकशुकाट पसरला आहे. या भागात अनेक लोकांनी आपल्या घराच्या गेटवर जातीचं नाव लिहिलं आहे. पुन्हा दंगल भडकली किंवा जमाव आला तर किमान घरावरील जात पाहून घराला आग लावणार नाहीत, या आशेने घरांवर जात लिहिली जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. बीबीसीने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
मैतेई समुदायला एसटीमध्ये दाखल व्हायचं आहे. त्याला विरोध होत आहे. त्यासाठी मार्च काढण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. ऑल ट्रायबल स्टुडंट्स यूनियनने या मार्चची हाक दिली आहे. त्यामुळे त्याला विरोध होत आहे. या विरोधासाठी हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले अन् हिंसेला सुरुवात झाली आहे. या आंदोलनावेळी चुराचांदपूरमध्ये हिंसा भडकली. तोरबंगमध्ये आदिवासी आणि गैरआदिवासी यांच्यात हाणामारी झाली. ही हिंसा रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे जमाव संतापला आणि त्यांनी जाळपोळ करण्यास सुरुवात केली. जमावाने घरेच पेटवून देण्यास सुरुवात केली. त्यामुळे लोक घर सोडून पळू लागले.
हिंसा अधिक भडकण्याची शक्यता असल्याने पश्चिम इंफाळ, जीरिबाम, थौबल, काकचिंग आणि विष्णपूरसह आदिवासी बहूल चुराचांदपूर, तेंगनौपाल आणि कांगपोकमी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. सध्या या ठिकाणच्या संचारबंदीत शिथिलता देण्यता आली आहे. सध्या या परिसरातील वातावरण नियंत्रणात असून या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे.
मैतेई समाज मणिपूरच्या डोंगराळ भागात राहतो. एसटीमध्ये समावेश करण्याची या समाजाची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे. या समाजात हिंदू सर्वाधिक आहे. आणि आदिवासी परंपरेचं ते पालन करतात. बांगलादेश, म्यानमारमधून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे. त्याचा परिणाम आमच्यावर होत आहे, असं या समुदायाचं म्हणणं आहे. राज्यातील अनेक नेत्यांनीही या मागणीचं समर्थन केलं आहे. मैतेई समाजाची हीच मागणी मणिपूरमधील हिंसेचं कारण बनलं आहे. या मागणीला ऑल ट्रायबल स्टुडंट्स यूनियनने जोरदार विरोध केला आहे. युनियनने रॅली काढून हा विरोध दर्शवला होता. त्यानंतर हिंसा भडकली.