बिहारमधील सिंघम IPS शिवदीप लांडे राजकारणात आजमवणार नशीब, या पक्षात प्रवेश करणार?

| Updated on: Sep 21, 2024 | 10:03 AM

बिहार पोलिसात राजीनाम्याचे सत्र सुरु झाल्याचे बोलले जात आहे. बिहारचे सुप्रसिद्ध IPS अधिकारी शिवदीप वामनराव लांडे यांनी भारतीय पोलीस सेवेचा राजीनामा दिला आहे. शिवदीप लांडे हे बिहारमध्ये 'सिंघम' म्हणून ओळखले जातात. यापूर्वी IPS काम्या मिश्रा यांनीही दरभंगा येथील ग्रामीण एसपी पदाचा राजीनामा दिला होता.

बिहारमधील सिंघम IPS शिवदीप लांडे राजकारणात आजमवणार नशीब, या पक्षात प्रवेश करणार?
Follow us on

बिहारमधील आयपीएस काम्या मिश्रा यांच्यानंतर आता आयपीएस शिवदीप वामनराव लांडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिवदीप लांडे यांना नुकतेच पूर्णिया रेंजचे आयजी बनवण्यात आले होते. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून राजीनामा दिल्याची माहिती दिली आहे. आयपीएस लांडे यांनी त्यांच्या 18 वर्षांच्या कार्यकाळात बिहारची सेवा केली. पण त्यांनी आता नवीन क्षेत्रात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र आयपीएस शिवदीप लांडे यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. यापूर्वी आयपीएस काम्या मिश्रा यांनीही राजीनामा दिला होता, जो अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही. पोलीस खात्याची यावर भूमिका काय असेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यांच्या भविष्यातील योजना अद्याप कोणीही उघड केल्या नाहीत. पण, काही लोकांचा अंदाज आहे की ते प्रशांत किशोर यांच्या पक्षात 2 ऑक्टोबरला सामील होऊ शकतात.

शिवदीप लांडे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘माय डियर बिहार, गेली 18 वर्षे सरकारी पदावर काम केल्यानंतर आज मी या पदाचा राजीनामा दिला आहे. एवढ्या वर्षात मी बिहारला माझ्या आणि माझ्या कुटुंबापेक्षा वरचढ मानले आहे. सरकारी कर्मचारी असताना माझ्या कार्यकाळात काही चूक झाली असेल तर मी त्याबद्दल माफी मागतो. आज मी भारतीय पोलीस सेवेचा (आयपीएस) राजीनामा दिला आहे, पण मी बिहारमध्येच राहीन आणि भविष्यातही बिहार हेच माझे कार्यस्थान राहील.

महाराष्ट्रातील रहिवासी

2006 च्या बॅचचे IPS शिवदीप लांडे हे मूळचे महाराष्ट्रातील अकोला येथील राहणारे आहेत. शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या शिवदीप लांड यांनी शिष्यवृत्तीच्या मदतीने शिक्षण घेतले. पुढे अभियांत्रिकीची पदवी घेतली. यानंतर ते यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले आणि आयपीएस अधिकारी झाले. शिवदीप लांडे हे बिहार केडरचे अधिकारी असले तरी त्यांनी काही काळ महाराष्ट्रातही काम केले. ते बिहारमध्ये एसटीएफचे एसपी असताना त्यांची महाराष्ट्र केडरमध्ये बदली झाली. महाराष्ट्रात त्यांनी एटीएसमध्ये डीआयजी पदापर्यंत काम केले. यानंतर ते बिहारला परतले.

हे सुद्धा वाचा

आयपीएस काम्या मिश्रा यांचा ही राजीनामा

दरभंगा येथे ग्रामीण एसपी म्हणून तैनात असलेल्या आयपीएस काम्या मिश्रा यांना बिहारमध्ये ‘लेडी सिंघम’ म्हणूनही ओळखले जाते. दिल्ली विद्यापीठातून उत्तीर्ण झालेल्या काम्या मिश्रा यांनी 2019 मध्ये पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण केली होती. UPSC परीक्षेत त्यांना 172 वा क्रमांक मिळवला होता. मूळच्या ओडिशातील काम्याला बिहार केडर देण्यात आले होते. काम्याचे पती अवधेश दीक्षित हे बिहार कॅडरचे आयआयटीयन आणि आयपीएस आहेत. त्यांची पोस्टिंग सध्या मुझफ्फरपूरमध्ये आहे आणि दोघांनी 2021 मध्ये उदयपूरमध्ये लग्न केले.

अधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामागे पीके प्रभाव?

IPS शिवदीप लांडे आणि IPS काम्या मिश्रा यांना बिहारमध्ये प्रामाणिक आणि मेहनती अधिकारी म्हणून ओळखले जाते. दोघांच्या राजीनाम्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्यांना सामाजिक कार्यात रस घ्यायचा असल्याचे मानले जात आहे. शिवदीप लांडे भविष्यात काय करणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. नुकतेच राजीनामा दिलेले अधिकारी प्रशांत किशोर यांच्या 2 ऑक्टोबरला सुरू होणाऱ्या पक्षात सामील होऊ शकतात, असा अंदाज काही मीडिया रिपोर्ट्समध्ये वर्तवला जात आहे.