भरतपूर : राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात पोलिसांना चक्रावून टाकणारा आणखी एक गुन्हा समोर आला आहे. भरतपूरच्या डीग पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. पैशांच्या हव्यासातून लोक नात्याचे रक्त प्यायलाही मागेपुढे पाहत नसल्याचे या धक्कादायक घटनेतून उघडकीस आले आहे. अपघाती विम्याचा खोटा दावा करण्यासाठी एका कलयुगी मुलाने त्याच्या दोन साथीदारांना सोबतीला घेऊन जन्मदात्या पित्याची हातोड्याने निर्घृण हत्या केली. 24 डिसेंबरच्या रात्री आरोपींनी ही घटना घडवली. पोलिसांनी हत्येतील आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाची सत्यता समजताच पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली असून संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास डीग पोलिसांकडून केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्याकांडात बळी ठरलेला मोहकम हा डीग पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नागला भधई गावचा रहिवासी होता. मोहकम हा त्याचा मुलगा राजेशसोबत फरीदाबाद येथे राहत होता. सुमारे चार महिन्यांपूर्वी राजेशने वडील मोहकम यांचा चार वेगवेगळ्या बँकांमध्ये 40 लाख रुपयांचा अपघाती विमा उतरवला होता. त्यानंतर त्याला पैशांच्या हव्यासाने स्वस्थ बसू दिले नाही. वडिलांच्या मृत्यूनंतर आपल्याला 40 लाखांच्या विम्याचे पैसे मिळणार, मात्र वडिलांचा अपघाती मृत्यू होईपर्यंत किती काळ वाट बघायची? या विचाराने राजेशने वडिलांना ठार करायचे ठरवले. त्यानंतर वडिलांच्या अपघाती विम्याचा लाभ घेण्यासाठी खोटा विमा दावा उभा करण्याची योजना आखली. त्यासाठी मोहकमला शहरातून गावात आणण्याचा प्लान तयार करण्यात आला.
24 डिसेंबर रोजी हत्येचे प्लॅनिंग सत्यात उतरवण्याची तयारी सुरू करण्यात आली. याचदिवशी राजेशने त्याच्या मित्रांना सोबत घेतले आणि वडिलांना सुनियोजित पद्धतीने घरी आणले, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. संध्याकाळी वाटेत राजेशने वडील व त्याच्या साथीदारांना आधी दारू पाजली. त्यानंतर डीग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिडवली गावाजवळ संधी पाहून राजेशने साथीदारांच्या मदतीने वडिलांवर हातोड्याने वार करून त्यांची निर्दयीपणे हत्या केली. नंतर अपघात झाल्यासारखे वाटावे म्हणून मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला. अपघाती विम्याचे 40 लाख रुपये लाटण्यासाठी हा प्लान केला गेला होता.
वडिलांची हत्या केल्यानंतर राजेश हा त्याच्या साथीदारांसोबत दारूच्या नशेत रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर फिरत होता. यादरम्यान रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्यांना पकडले. पोलिसांनी त्यांची संशयावरून चौकशी सुरू केली. त्यावेळी समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पोलिसांनी तिन्ही आरोपींना शांतता भंग केल्याप्रकरणी अटक केली. नंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 25 डिसेंबर रोजी सकाळी डिडवली गावाजवळ एका व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पुढील तपासाला गती मिळून धक्कादायक हत्याकांडाचा उलगडा झाला. नंतर आरोपींनी स्वतःच हत्येची कबुली दिली. (The son planned to kill his father to get Rs 40 lakh in accident insurance)
इतर बातम्या
IT Raid: पियुष जैनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जाणून घ्या ब्लॅकमनीचे संपूर्ण सत्य