नवी दिल्ली: आगामी तीन वर्षांमध्ये भारतामध्ये अमेरिकेच्या दर्जाचे रस्ते पाहायला मिळतील, असे वक्तव्य केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले. देशभरात सध्या रस्तेनिर्मितीचे काम वेगाने सुरु आहे. सध्याच्या घडीला भारतात दररोज 38 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार होत आहेत. यापूर्वी रस्ते बांधणीचा वेग दिवसाला दोन किलोमीटर इतका होता, असे नितीन गडकरी यांनी म्हटले. ते शनिवारी अहमदाबाद येथील कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी नितीन गडकरी यांच्या हस्ते बनासकांठा आणि दिसाला जोडणाऱ्या 3.75 किमी लांबीच्या चौपदरी इलिवेटेड कॉरिडॉअरचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी नितीन गडकरी आपल्या सरकारच्या काळात झालेल्या विकासकामांचा पाढा वाचला. येत्या तीन वर्षात भारतात अमेरिकेच्या दर्जाप्रमाणे रस्त्यांची निर्मिती होईल. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात राष्ट्रीय महामार्गांचे जाळे विणले जात आहे. रस्त्यांची कामे अतिश्य वेगाने सुरु असल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वीच नितीन गडकरी यांनी देशात रस्ते बांधकामासाठी 15 लाख कोटी खर्च करणार असल्याची जाहीर केले होते. विमानतळ, मेट्रो रेल्वे, रेल्वे स्थानकांसह पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याची मोठी संधी आपल्यासमोर आहे. इलेक्ट्रिक पब्लिक ट्रान्सपोर्टमध्येदेखील गुंतवणूक करण्याची संधी आपल्याकडे असल्याचे गडकरी यांनी म्हटले होते.
भारताने यावर्षी 20 मार्चपर्यंत 1,37,625 किलोमीटरपर्यंत महामार्गांचे बांधकाम केले आहे. एप्रिल 2014 पर्यंत 91,287 किलोमीटर महामार्गांचे बांधकाम करण्यात आले होते. या कालावधीत भारताने महामार्गांच्या बांधकामासाठी पाचपट जास्त पैसे खर्च केले आहेत. गेल्या सात वर्षात भारताने राष्ट्रीय महामार्गाची लांबी 50 टक्क्यांनी वाढवल्याचा दावाही गडकरी यांनी केला होता.
संबंधित बातम्या:
गडकरीजी मानलं… 24 तासांत ‘एक्स्प्रेस वे’चा अवघड भाग बांधला; विश्वविक्रमाचे फडणवीसांकडून कौतुक
‘त्या’ महान अधिकाऱ्यांची छायाचित्रे इमारतीत लावा; नितीन गडकरी कामचुकार अधिकाऱ्यांवर संतापले