मुंबई : राजस्थानात वर्षअखेर विधानसभा निवडणूका असून माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या पक्षाविरूद्धच्या आंदोलन उभे करण्याच्या निर्णयावर कॉंग्रेस पक्ष श्रेष्टी काही तरी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. कॉंग्रेसच्या अंतर्गत वादात निवडणूका कशा पार पाडायच्या त्यासाठी मोर्चे बांधणी सुरू आहे. त्यामुळे आता कर्नाटक निवडणूकांचा निकाल लागताच कॉंग्रेस सचिन पायलट आणि अशोक गहलोत वादावर काही तरी तोडगा काढण्याच्या विचारात आहे. या निर्णयाने मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या खुर्चीला सध्यातरी धोका नसून त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूका लढविल्या जाणार आहेत.
राजस्थानात नाराज सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांच्या वादावर एक अंतिम तोडगा देण्याच्या विचारात कॉंगेस पक्ष श्रेष्ठी आहेत. आता हा तोडगा ते मान्य करतात की नाही हे येणारा काळच ठरवणार आहे. त्यांना नेमका काय तोडगा सुचविण्यात येणार आहे या विषयी अद्याप काही कळालेले नाही. आणि हा तोडगा अशोक गहलोत यांना मान्य होणार का यावर देखील प्रश्नचिन्हच आहे.
राज्यातील बदलत्या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे राजस्थानचे प्रभारी सुखविंदर सिंह रंधावा यांनी दिल्लीत प्रदेश अध्यक्ष आणि सह प्रभारी यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष गोंविद सिंह डोटासरा देखील सामील होणार आहेत. सह प्रभारी काजी निजामुद्दीन, अमृता धवन आणि विरेंद्र राठोड देखील सामील होणार आहेत.
राजस्थानात माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट भ्रष्टाचार आणि पेपर फुटी प्रकरणात अजमेर ते जयपूर अशी पदयात्रा काढण्याच्या तयारी करीत असतानाच कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची ही बैठक पार पडत आहे. पायलट यांचे निकटवर्तीय आमदार वेद प्रकाश सोलंकी यांनी देखील पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून रंधावा यांची तक्रार केली आहे. रंधावा हे पक्षाच्या राज्य कार्यकारीणीत ताळमेळ राखण्यात अपयशी ठरल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.