कुलगाम | 5 ऑगस्ट 2023 : जम्मू-काश्मीरमधील कुलगामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या दरम्यान झालेल्या चकमकीत तीन जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात आधी हे तीन जवान जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना या तिघांचा मृत्यू झाला. दरम्यान, कुलगाममधील चकमक थांबली असली तरी सुरक्षा दलाने या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. या परिसरात अतिरिक्त जवान पाठवण्यात आले आहेत.
दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात हलन फॉरेस्ट एरियामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यामुळे सुरक्षा दलाच्या जवानांनी या परिसरात घेराबंदी केली. तसेच सर्च ऑपरेशन सुरू केलं. हे सर्च ऑपरेशन सुरू असतानाच अचानक अतिरेक्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार सुरू केला. त्यामुळे जवानांनी बचावात्मक पवित्रा घेत दहशतवाद्यांना जशासतसं उत्तर दिलं. सर्च ऑपरेशनचं रुपांतर एन्काऊंटरमध्ये झालं. या गोळीबारात तीन जवानांना गोळी लागल्याने ते शहीद झाले.
या हल्ल्यावर भारतीय लष्कराने ट्विट केलं आहे. कुलगाममधील हलच्या उंच पहाडावर अतिरेकी लपल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती मिळताच जवानांनी काल या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं. या चकमकीत तीन जवान जखमी झाले. त्यानंतर उपचार सुरू असताना या तिन्ही जवानांचा मृत्यू झाला. या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे, असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
यापूर्वी पुंछमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं होतं. पुंछ येथील सिंधरा परिसरात चार दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं होतं. इंडियन आर्मीची स्पेशल फोर्स, नॅशनल रायफल्स आणि जम्मू-काश्ममीर पोलिसांनी संयुक्तपणे हे ऑपरेशन केलं होतं. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये विदेशी अतिरेकीही होते.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जम्मू आणि काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या कारवाया वाढल्या आहेत. त्यामुळे या भागात जवानांची गस्त वाढवण्यात आली आहे. सीमेपलिकडून हे अतिरेकी येत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे जवानांकडून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक संशयित व्यक्तीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.