Ayodhya Ram mandir : रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्येत भाविकांचा महापूर लोटला आहे. प्रभू रामाच्या दर्शनासाठी हजारो भाविक अयोध्येत दाखल होत आहेत. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी लाखो भाविकांनी अयोध्या नगरी गजबजली आहे. गर्दी हाताळताना मंदिर व्यवस्थापनाला मोठ्या अडचणी येत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते रामललावर अभिषेक करण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी तीन लाख भाविकांनी दर्शन घेतल्याचे उत्तर प्रदेश सरकारने म्हटले आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. आठ हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
रामललाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. गृह विभागाचे प्रधान सचिव संजय प्रसाद आणि कायदा व सुव्यवस्था महासंचालक प्रशांत कुमार स्वतः गर्भगृहात उपस्थित होते. यावेळी त्यांनी व्यवस्थेचा आढावा घेतला. रामललाचे सहज दर्शन करता यावे साठी पोलीस आणि प्रशासन सतर्क आहे.
अयोध्येत गर्दी वाढल्याने आजबाजुच्या जिल्ह्यातील पोलीस देखील अलर्ट झाले आहेत. त्यांनी भाविकांना अयोध्येत लगेचच न जाण्याचे आवाहन केले आहे. कारण आतापर्यंत तीन लाख भाविकांनी दर्शन घेतले असून अजून बरेच लोकं अयोध्येत दाखल झाले आहेत. बाराबंकी पोलिसांनी गाड्यांचे रुट बदलले असून अयोध्येपासून १०० किलोमीटरवर असलेल्या बाराबंकी येथेच भाविकांना राहण्याचे आवाहन केले आहे. भाविकांच्या अनेक किलोमीटर लांब रांगा लागल्या आहेत.
रामपथावर गर्दी टाळा असे देखील प्रशासनाने आवाहन केले आहे. स्थानिकांना देखील लोकांची गैरसोय होणार नाही म्हणून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
#WATCH | Uttar Pradesh: People break through security at Shri Ram Janmabhoomi Temple in Ayodhya.
The Pran Pratishtha ceremony was done yesterday at Shri Ram Janmabhoomi Temple. pic.twitter.com/vYEANsXQkP
— ANI (@ANI) January 23, 2024
रामललाच्या अभिषेकनंतर भगवान श्रीरामाच्या दर्शनासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. रात्रीच लोक अयोध्येत दाखल होण्यास सुरुवात झाली होती. हजारो भाविकांना पहिल्याच दिवशी रामलल्लाचे दर्शन घ्यायचे होते. पण ही संख्या लाखोंवर गेली आहे. पहाटे २ वाजल्यापासूनच राम मंदिराच्या मुख्य दरवाजाबाहेर भाविकांची मोठी रांग लागली होती. लोक गेटसमोर ‘जय श्री राम’चा जयघोष करत होते.
राममंदिराच्या उद्घाटनाच्या आधीच अयोध्येतील हॉटेल बुकिंग फूल झाले आहेत. लोकांनी आधीच हॉटेलचे बुकींग केले आहे. त्यामुळे दर वाढले आहेत. काही आलिशान खोल्यांचे भाडे एक लाख रुपयांपर्यंत गेले आहे. विशेष म्हणजे भाड्यात एवढी वाढ होऊनही हॉटेल बुकिंग दररोज वाढत आहे.
22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गर्भगृहात उपस्थित होते. यावेळी देशातील अनेक मोठ्या व्यक्तींनी देखील या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी आवर्जून हजेरी लावली. ज्यामध्ये उद्योगपती मुकेश अंबानी, बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन, रणवीर कपूर, आलिया भट्ट, साऊथ सुपरस्टार रजनीकांत, चिरंजीवी, राम चरण यांच्यासह देशातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.