Tirupati Balaji : तिरुपती बालाजी मंदिर हे जगप्रसिद्ध आहे. या मंदिरात प्रसाद म्हणून दिले जाणाऱ्या लाडूच्या प्रसादावरुन सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादावरून राज्यातच नाही तर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. इतकंच नाही तर दोन दिग्गज अभिनेते प्रकाश राज आणि पवन कल्याण हे देखील आमने-सामने आलेत. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेय. तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) चे माजी अध्यक्षांनी या संपूर्ण प्रकाराची चौकशीची मागणी केलीये. पण या लाडूंवरुन वाद सुरु असतानाच या वादाचा मात्र मंदिरात येणाऱ्या भाविकांवर कोणताही परिणाम झालेला दिसत नाहीये. हा मुद्दा आता भूतकाळातील झाला आहे. त्यामुळे तिरुपती मंदिरात लाडूंची विक्री नेहमी प्रमाणे सुरू आहे. दररोज बालाजी मंदिरातून 3.50 लाख लाडूंची विक्री केली जाते. गेल्या चार दिवसांत 14 लाखांहून अधिक लाडू विकले गेले आहेत.
19 सप्टेंबर 3.59 लाख
20 सप्टेंबर 3.17 लाख
21 सप्टेंबर 3.67 लाख
22 सप्टेंबर 3.60 लाख
आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात दररोज हजारो भाविक येत असतात. देशातूनच नाही तर जगभरातून भाविक येत असतात. मंदिरात जो प्रसाद दिला जातो त्या प्रसादाला ही धार्मिक महत्त्व आहे. इतकंच नाही तर भाविक प्रसाद खरेदी करून तो आपल्या सोबत इतरांना देण्यासाठी देखील घेऊन जातात. बदाम, बेदाणे, काजू, बंगाली हरभरा, साखर आणि गाईच्या तूपापासून हे लाडू तयार केले जातात.
तिरुपती बालाजी मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला होता. वायएसआरसीपी सरकार असताना असा प्रकार सुरु असल्याचं त्यांनी म्हटले होते. राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी केली आणि प्रयोगशाळेच्या अहवालातही याची पुष्टी झाल्याचे सांगितले.
माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. जगन मोहन रेड्डी यांनीच प्राण्यांची चरबी वापरण्यास परवानगी दिल्याचा आरोप चंद्राबाबू नायडू यांनी केला होता. मात्र, जगन मोहन रेड्डी यांनी नायडू राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.