मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पानिपतवर शौर्यभूमीला वंदन केल्यानंतर म्हणाले….
“पानिपत ही मराठी माणसाची एक भळभळती जखम आहे. त्याचवेळी मराठी माणसाचा अभिमान पानिपत आहे. ज्या प्रकारे मराठ्यांनी पानिपतच्या युद्धात शौर्य दाखवलं, अतिशय विपरित परिस्थितीत मराठे लढले ते खरं म्हणजे युद्धाच्या इतिहासातील अत्यंत मोठी अशा प्रकारची गोष्ट पहायला मिळते. या शौर्यानंतर आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर अनेक आमचे मराठे सैनिक वीरगतीला प्राप्त झाल्यानंतर देखील मराठ्यांनी हार मानली नाही. त्यानंतर दहा वर्षात पुन्हा मराठ्यांनी भारतावर भगवं राज्य प्रस्थापित केलं, दिल्ली देखील जिंकून दाखवली” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पानिपतमधील मराठ्याच्या शौर्यभूमीला वंदन केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
“ही मराठ्यांची वीरता आहे, शौर्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ते हिंदवी स्वराज्य नंतर छत्रपतींच्या आशिर्वादने संपूर्ण भारतात पसरवण्याचं काम मराठ्यांनी केलं. पानिपत एक अशा प्रकारची लढाई आहे, त्यात जरी तांत्रिक दृष्टया पराजय झाला असला, तरी मराठी हरले नाहीत. त्यांनी आपलं शौर्य सातत्याने इतकं वाढवलं की, त्यानंतर भारतावर अशा प्रकारे आक्रमण करण्याची हिंम्मत कोणाची झाली नाही” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘आमचा इतिहास जिवंत ठेवण्याच काम त्यांनी केलं’
“आम्ही शौर्य भूमीला वंदन करण्यासाठी आलो. मी शौर्य भूमीच्या ट्रस्टचे मनापासून आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. आमचा इतिहास जिवंत ठेवण्याच काम त्यांनी केलं. या ठिकाणी मातृभूमीकरता धारातीर्थी पडलेल्या मराठ्यांना ट्रस्टच्या माध्यमातून सातत्याने आदरांजली-श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम चालतो. मराठ्यांच्या शौर्याच संवर्धन करण्याच काम ट्रस्ट करतय म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो” असं देवेद्र फडणवीस म्हणाले.
यशवंतराव चव्हाणांनंतर पानिपतला जाणारे दुसरे मुख्यमंत्री
पानिपतमध्ये काही घोषणा करणार का? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “ट्रस्टसोबत माझी चर्चा झाली आहे. काही गोष्टी त्यांनी लक्षात आणून दिल्या आहेत. इथलं स्मारक अधिक चांगल्या पद्धतीने कसं करता येईल, त्यासाठी जे जे आवश्यक असेल, त्यात महाराष्ट्र सरकार पुढाकार घेईल” यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर पानिपतला येणारे तुम्ही महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री आहात, यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मंगल भूमीला वंदन करण्यासाठी येणं हे मी माझं सौभाग्य मानतो. जेव्हा-जेव्हा मला संधी मिळेल, मी इथे येत राहीन”
आता भगव्याखाली आणि तिरंग्याखाली एकत्र येणं गरजेच
महाराष्ट्रात जातीपातीच राजकारण दिसतय, पण पानिपतमध्ये महाराष्ट्रातील सगळ्या जाती एकत्र लढल्या, त्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. “शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्यात अठरापगड जाती एकत्र होत्या. लोक एकत्र येऊन मावळे म्हणून लढले. त्यांनी स्वराज्य विस्तारीकरणाच काम केलं. आम्ही एकत्र राहिलो, तर सुरक्षित आहोत. पुन्हा जाती-पातीमध्ये विभाजन झालं, तर प्रगती करता येणार नाही. शिवाजी महाराजांनी भगव्या झेंड्याखाली आम्हाला सर्वांना एकत्र आणलं. आता भगव्या झेंड्याखाली आणि भारताच्या तिरंग्याखाली एकत्र येणं गरजेच आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.