नवी दिल्ली (संदीप राजगोळकर) | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत अखेर निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे. बऱ्याच दिवसांपासून याची चर्चा होती. निवडणूक आयोगाच्या निकालाची प्रतिक्षा होती. निवडणूक आयोग काय निकाल देणार? याची उत्सुक्ता होती. आज बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत. पण शरद पवार राजकारणात आजही सक्रीय आहेत, त्यामुळे निवडणूक आयोग शिवसेनेपेक्षा वेगळा निकाल देणार का? याकडे सगळ्यांच लक्ष होतं. पण निवडणूक आयोगाने शिवसेनेसारखाच निकाल दिला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागच्यावर्षी जुलै महिन्यात दोन गट पडले होते. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आमदार आणि नेत्यांचा एक गट शिवसेना-भाजपा महायुती सरकारमध्ये सहभागी झाला. त्याचवेळी शरद पवार गट विरोधी बाकांवर बसला. दोन्ही गटांनी आपणच अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत, म्हणून निवडणूक आयोगात धाव घेतली होती. बरेच महिने ही सुनावणी सुरु होती.
अखेर निवडणूक आयोगाने अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळालय. शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्हासाठी अर्ज करायला निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. लोकसभा निवडणुकीला काही महिने राहिले असताना हा निर्णय आलाय. याचे महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहेत. अजित पवार गट अधिकृत पक्ष असल्याने त्यांच्यासाठी बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत. त्याचवेळी शरद पवार गटाला नव्याने पक्ष बांधणी करावी लागणार आहे. विधानसभा आणि लोकसभेतील बहुमत हे अजित पवार गटाच्या बाजूने होतं. तेच निर्णायक ठरलं.
शरद पवार गटाचा एक महत्त्वाचा निर्णय
दरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवार यांनी वकिलांशी चर्चा केली. कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांच्यासोबत शरद पवारांनी फोनवरून चर्चा केली. आज शरद पवार गट सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाणार आहे. आता सुप्रीम कोर्टाची भूमिका काय असेल? त्यावरही बरच काही अवलंबून आहे.