नवी दिल्ली, दि. 1 जानेवारी 2024 | देशातील महामार्ग आणि राज्य महामार्गांवर फास्टॅगच्या माध्यमातून टोल कापण्याची सुविधा सुरु झाली आहे. इलेक्ट्रिॉनिक टोल कलेक्शन सिस्टम (ईटीसी) प्रणालीने हा टोल कापला जात आहे. परंतु ही फास्टॅग प्रणाली अनेकांसाठी अडचणीची ठरत आहे. प्रवास न करताना लाखो जणांचा टोल कापला गेला आहे. तसेच जास्त टोलही गेल्याची लाखो तक्रारी हेल्पलाइन नंबर १०३३ वर झाल्या आहेत. मागील आर्थिक वर्षात या तक्रारीचा डाटा समोर आला आहे. फास्टॅगसंदर्भात वर्षभरात साडेआठ लाख तक्रारी आल्या आहेत. म्हणजेच रोज २४०० तक्रारी आल्या आहेत.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालया अंतर्गत असलेली भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्रबंधन कंपनी लिमिटेडने २०२२-२३ चा अहवाल जारी केला आहे. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील टोलसंदर्भात तक्रारी आणि सुविधांसाठी या कंपनीची स्थापना करण्यात आली. हेल्पलाईन क्रमांकावर आठ लाख ६६ हजार तक्रारी आल्या आहेत. त्यातील १ लाख ५५ हजार ६५७ जणांनी आपण प्रवास केला नसताना टोल कापला गेल्याचे म्हटले आहे. तसेच १ लाख २६ हजार ८५० जणांनी फास्टॅगच्या माध्यमातून जास्त टोल कापला गेल्याची तक्रार आहे.
फास्टॅगसंदर्भात आणखी एक वेगळी तक्रार लाखो लोकांनी केली आहे. १ लाख ६८ हजार जणांनी फास्टॅग असताना टोल प्लाझा बॅरियरने जाऊ दिले नाही, अशी तक्रार केली आहे. तसेच ३५ हजार ५८० जणांनी बँकेत पुरेशी रक्कम असताना रक्कम नसल्याचे दाखवले गेले आहे. दरम्यान आलेल्या शंभर टक्के तक्रारी सोडवण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. फास्टॅग नसताना दुप्पट दंड आकारला जाण्याची तरतूद आहे. तसेच फास्टॅग असताना बॅरियर पार करता येत नसल्यास फास्टॅग नाही, असे समजले जाते. या परिस्थितीत दुप्पट टोल द्यावा लागतो. यामुळे आपले खाते नियमित तपासणे आवश्यक आहे.