उत्तर प्रदेश : सोनभद्रमधील सल्यादीह गावातील बँक रोडवर राहणाऱ्या एका प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या घरात अगदी आनंदी वातावरण होते. त्यांच्या मोठा मुलगा हा दुधी येथील इंटरचा विद्यार्थी होता. पण, आपले शिक्षण सांभाळून तो आपल्या वडिलांच्या दुकानात जात होता. त्यांना कामात मदत करत होता. ते सराफा व्यापारीही आपल्या मुलाची प्रत्येक इच्छा पूर्ण करायचे. आपली खोली वेगळ्या पद्धतीने सजवण्याचा आग्रह मुलाने धरला होता. त्याची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी छत्तीसगडमधील अंबिकापूर येथून कारागिरांना बोलावले होते. खोलीचे काम सुरु होते.
सराफा व्यापाऱ्याच्या तो मुलगा रविवारी सकाळी वडिलांचे दुकान उघडण्यासाठी गेला. दुपारपर्यंत दुकानात थांबून दुपारी जेवणासाठी तो घरी आला. आपल्या कुटुंबासोबत काही वेळ बोलून तो आपल्या खोलीत गेला. सायंकाळी ७ वाजेपर्यंत तो खोलीबाहेर आला नाही. त्यामुळे घरातील सदस्यांनी त्याच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. पण, आतून काहीच उत्तर आले नाही. त्यानंतर त्यांनी दरवाजा तोडला. ते आत गेले असता त्यांना धक्कादायक दृश्य दिसले.
दरवाजा ठोठावूनही मुलगा बाहेर येत नसल्याचे पाहून घरच्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी त्याच्या मुलाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांना आढळून आले. घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत तो त्यांना आढळून आला.
नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार त्या मुलाचे घरात कुणाशीही भांडण नव्हते, ना त्याला कोणत्या गोष्टीचा तणाव होता. मग त्याने असे आत्महत्येचे पाऊल का उचलले ते समजत नाही.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तपास हाती घेतला. त्यांनी त्या तरुणाचा मोबाईल तपासला असता त्यांना त्या मुलाने यूट्यूबवर आत्महत्येच्या पद्धती शोधल्याची माहिती मिळाली. दुपारी 1.30 वाजता त्याने इन्स्टाग्रामवर ‘गुड बाय’ लिहिले होते असेही पोलीस तपासात आढळून आले.
मुलाची प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे सराफा व्यापारी यांनी मुलाच्या इच्छेनुसार त्याच्या खोलीचे काम सुरु केले होते. त्यासाठी खास कारागीर बोलावण्यात आले होते. त्याने हे पाऊल उचलले तेव्हा खोलीचे काम सुरू होते असे सांगितले.
रविवारी दुपारी दुकानातून परतल्यानंतर मुलाने आईकडून चहा बनवून घेतला. चहा पिताने तो कुटुंबासोबत बोलत होता. त्यानंतर तो बाजारात गेला आणि परत आल्यावर तो थेट त्याच्या खोलीत गेला. नेहमीप्रमाणे तो खोलीत अभ्यासाला गेला असावा किंवा झोपला असावा असे कुटुंबीयांना वाटले. मात्र, संध्याकाळ झाली तरी दरवाजा न उघडल्याने त्याच्या खोलीचा दरवाजा ठोठावला आणि ही दुर्दैवी घटना उघडकीस आली.