रायपूर | 10 डिसेंबर 2023 : तब्बल आठ दिवसाच्या माथापच्चीनंतर अखेर भाजपने छत्तीसगडचा नवा मुख्यमंत्री निवडला आहे. विष्णूदेव साय हे छत्तीसगडचे मुख्यमंत्री होणार आहेत. भाजपचने साय यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. विधीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. थोड्याच वेळात साय यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. साय यांच्या माध्यमातून भाजपने मास्टरस्ट्रोक मारल्याची चर्चा आहे. राज्यात 32 टक्के आदिवासी समाज आहे. आदिवासी समाजच राज्यातील सत्ता कुणाच्या हाती असेल हे ठरवत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साय यांची निवड करून भाजपने मोठी खेळी खेळल्याचं सांगितलं जात आहे.
विष्णऊदेव साय हे छत्तीसडच्या कुनकुरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. राज्यात आदिवासी समाजाची लोकसंख्या 32 टक्के आहे. साय हे सुद्धा आदिवासी समाजातून येतात. अजित जोगी यांच्यानंतर राज्यात एकही आदिवासी मुख्यमंत्री झाला नव्हता. आता साय यांच्या निमित्ताने राज्याला पुन्हा एकदा आदिवासी मुख्यमंत्री मिळाला आहे. विष्णूदेव साय हे 2000मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्षही होते. निवडणूक काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यात आम्हाला सत्ता द्या, विष्णूदेव साय यांना मी मोठा नेता बनवेल अशी घोषणा केली होती. त्यानुसार साय यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.
लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपने कंबर कसली आहे. राज्यात आदिवासी समाज 32 टक्के आहे. हा समाज आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपने साय यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली आहे. साय यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिल्याने राज्यातील आदिवासी समाज भाजपच्या बाजूने येईलच, शिवाय देशभरातील आदिवासींनाही आपल्याकडे वळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
चार राज्यातील निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी आदिवासी, ओबीसी आणि महिला वर्ग या तीन वर्गाकडे लक्ष देण्याचं आवाहन केलं होतं, त्याचाच एक भाग म्हणून साय यांच्याकडे राज्याचं मुख्यमंत्रीपद सोपवलं गेलं असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
विष्णूदेव साय हे संघाच्या अत्यंत जवळचे आहेत. माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्याही ते अत्यंत जवळचे होते. 2014मध्ये नरेंद्र मोदी यांचं केंद्रात पहिल्यांदा सरकार आलं. तेव्हा साय यांच्याकडे केंद्रीय मंत्रीपदाची सूत्रे सोपवण्यात आली होती. साय यांची सुरुवात सरपंच पदापासून झाली होती. सरपंच ते मुख्यमंत्री हा साय यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे.