मध्यप्रदेशातील उज्जैनच्या प्रसिद्ध महाकाल मंदिरातून मोठी बातमी आहे. मुसळधार पावसामुळे महाकाल मंदिराच्या गेट क्रमांक 4ची भिंत कोसळली आहे. या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक भाविक दबले गेले आहेत. रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली असून त्यांनी बचावकार्य सुरू केलं आहे. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बचावकार्य वेगानं सुरू आहे. उज्जैनमध्ये अजूनही बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अगदी देवाच्याच दारात भक्तांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
उज्जैनमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे प्रसिद्ध महाकाल मंदिरावरच संकट ओढवलं आहे. महाकाल मंदिराच्या गेट नंबर 4जवळ ज्योतिषाचार्य पंडित आनंद शंकर व्यास यांच्या घराच्या बाजूला एक जुनी भिंत आहे. ही भिंत अचानक कोसळली. या भिंतीला लागून काही लोक देवपूजेचं साहित्य विकत होते. हे सर्व लोक भिंतीखाली गाडले गेले आहेत. महाकाल मंदिर प्रशासनालाही या दुर्घटनेची माहिती देण्यात आली आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळताच तातडीने बचाव पथकाला बोलवण्यात आलं. पोलिसांनाही या घटनेची माहिती दिली. पोलीस आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केलं आहे. तसेच मंदिर प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केलं आहे. ढिगाऱ्याखालून जखमांनी बाहेर काढून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. रेस्क्यू टीमने दोन मृतदेहही या ढिगाऱ्याखालून बाहेर काढले आहेत. या ढिगाऱ्याखाली किती लोक दबले असतील याची काहीच माहिती नाहीये. एसीपी प्रदीप शर्मा यांनीही दोन लोकांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, बचाव पथकाने तात्काळ ढिगारा उपसण्याचं काम सुरू केलं आहे. पण अंधार आणि मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळा येत आहे. मातीच्या ढिगाऱ्याचा पूर्णपणे चिखल झाला आहे. परिसरात पाणी भरलं आहे. त्यामुळे चिखल काढताना अधिकच समस्या निर्माण होत आहे. या शिवाय घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दीही जमा झाली आहे.
प्रत्यक्षदर्शींनी ही घटना कशी घडली याची माहिती दिली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, जोराचा पाऊस सुरू होता. आम्ही छत्री घेऊन गेट नंबर चारच्या जवळ उभे होतो. तेव्हा अचानक भिंत कोसळली. या भिंतीखाली दोन महिला आणि एक मुलगा दबला गेला. या घटनेत किती लोक जखमी झाले असतील किंवा किती लोक दबले असतील याची माहिती प्रत्यक्षदर्शींनाही नाहीये.