भोपाळ | 4 सप्टेंबर 2023 : लोकसभा निवडणुका आणि मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच भाजपमध्ये वादाच्या ठिणग्या पडण्यास सुरुवात झाली आहे. भाजपच्या फायरब्रँड नेत्या, माजी मुख्यमंत्री उमा भारती या भाजपवर प्रचंड संतापल्या आहेत. त्यांनी आता मला बोलावलं तरी मी तुमच्याकडे येणार नाही, असं म्हटलं आहे. त्यामुळे भाजचं टेन्शन वाढलं आहे. उमा भारती यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे भाजपला मध्यप्रदेशात मोठं नुकसान सोसावं लागणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
जन आशीर्वाद यात्रेचं निमंत्रण देण्यात आलं नसल्याने उमा भारती संतापल्या आहेत. त्यांनी ट्विट करून आपला संताप व्यक्त केला आहे. मला जन आशीर्वाद यात्रेचं निमंत्रण मिळालं नाही. मी हे म्हटलं हे निदर्शनास आणून दिलं आहे. निमंत्रण मिळाल्याने माझी उंची वाढणार नाही की कमी होणार नाही. पण आता मला यात्रेचं निमंत्रण दिलं तर मी जाणार नाही, असं उमा भारती म्हणाल्या. 25 सप्टेंबर रोजी या जनआशीर्वाद यात्रेचा समारोप होणार आहे. त्या समारोपाच्या कार्यक्रमालाही मी जाणार नाही. पार्टीने आता हे लक्षात घ्यावं, असा सज्जड दमच उमा भारती यांनी भरला आहे.
मात्र, दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचं गुणगाण गायलं आहे. चौहान यांच्याबद्दल माझ्या मनात अपार करूणा आहे. शिवराज मला जिथेही प्रचारााल बोलावतील तिथे मी प्रचाराला जाईल. मी त्यांचं ऐकून प्रचार करू शकते. ज्यांच्या घाम आणि रक्ताने भाजप वाढला आहे. त्यापैकी मी एक आहे, असं त्यांनी सांगितलं.
सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल झालं आहे. त्यावरूनही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी केंद्र आणि राज्यातील नेत्यांशी मध्यप्रदेशातील 230 विधानसभा जागांबाबत चर्चा केली आहे. त्यामुळे मला कोणतीही यादी तयार करून देण्याची गरज नाहीये. भाजपचा प्रत्येक उमेदवार माझा आहे, असं त्या म्हणाल्या. दरम्यान, उमा भारती यांनी आपल्या समर्थकांसाठी जागा मागितल्या असल्याचा मेसेज व्हायरल झाला होता. त्यावर त्या बोलत होत्या.
उमा भारती यांनी त्यांच्या आई, मुलगी आणि बाईच्या नावाने एक संस्था बनवली आहे. माता बेटी बाई वेल्फेअर असं या संस्थेचं नाव आहे. या संस्थेच्या कार्यक्रमातच त्यांनी भाजप सरकारच्या व्यवस्थेवर निशाना साधला होता. आता आपण सर्व नेत्यांनी, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री आणि सर्व अधिकाऱ्यांनी सरकारी रुग्णालयात उपचार घेतले पाहिजे.
तसेच मुलांना सरकारी शाळेत शिकायला पाठवलं पाहिजे. तरच या व्यवस्थांमध्ये सुधारणा होईल, असं त्या म्हणाल्या होत्या. उमा भारती यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक करतानाच पक्षावर टीका केली आहे. पक्षावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे उमा भारती यांच्या या खेळीवर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
आपल्या नेतंयांनी लग्नसराईत वायफळ खर्च करू नये. नेत्यांनी पंचतारांकित हॉटेलात थांबणं चुकीचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अशा प्रकारची जीवनशैली अजिबात आवडत नाही. मी या गोष्टींवर यापुढेही बोलत राहमार. आपण गांधीजी, दीनदयाल उपाध्याय आणि मोदी यांची शिकवण टाळू शकत नाही, असंही त्या म्हणाल्या.