येत्या 7 जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार?, राणे, हिना गावित यांचा समावेश होणार?

| Updated on: Jul 05, 2021 | 6:45 PM

येत्या 7 जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चर्चा आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात तरुण आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. (Cabinet Expansion)

येत्या 7 जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार?, राणे, हिना गावित यांचा समावेश होणार?
Follow us on

नवी दिल्ली: येत्या 7 जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चर्चा आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात तरुण आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात भाजप नेते नारायण राणे आणि खासदार हिना गावित यांचा समावेश करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे येत्या 7 जुलै रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. (Union Cabinet Expansion new ministers likely to take oath on July 7 says Government source)

येत्या 7 जुलै रोजी सकाळी 11 वाजता किंवा संध्याकाळी 6.30 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं सांगितलं जातं. तर काही सूत्रांच्या मते 9 जुलै रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होतो आणि यात कुणाकुणाची वर्णी लागते याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

या नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता

2019मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा सत्तेत आले. मात्र, दुसऱ्या टर्ममध्ये त्यांनी एकदाही मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला नाही. परंतु, आता मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या विस्तारात भाजपमधील नेत्यांसह एनडीएच्या मित्र पक्षांनाही स्थान मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य शिंदे, नारायण राणे आणि हिना गावित यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे सोनोवाल यांनी गेल्याच महिन्यात दिल्लीत येऊन भाजप नेत्यांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या.

मंत्र्यांच्या खात्यात फेरबदल?

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनीही नुकतीच मोदींची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांचीही मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना, शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर पडले आहेत. तर लोजपा नेते रामविलास पासवान यांचं निधन झाल्याने मंत्रिमंडळातील त्यांचं पद रिक्त आहे. त्याशिवाय अनेक मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल केला जाण्याची शक्यता आहे.

अपना दल, जेडीयूचा समावेश?

या शिवाय जेडीयू, अपना दलचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. पुढच्यावर्षी उत्तर प्रदेशात निवडणुका आहेत. त्यामुळे अपना दलच्या अध्यक्षा अनुप्रिया पटेल यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची चिन्हे आहेत. नुकतीच पटेल यांनी भाजपचे नेते अमित शहा यांची भेट घेतली होती.

राणे काय म्हणाले?

दरम्यान, भाजप नेते नारायण राणे यांनी आज सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशाबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी त्यावर हसून प्रतिक्रिया दिली. असं काही घडत असेल तर मी आभार मानतो. तुमच्या तोंडात साखर पडो. अधिकृत पत्रं येत नाही आणि जोपर्यंत शपथ घेत नाही, तोपर्यंत जरा धीर धरा, असं राणे यांनी हसत सांगितलं. (Union Cabinet Expansion new ministers likely to take oath on July 7 says Government source)

 

संबंधित बातम्या:

बंगालमध्ये काँग्रेसला झटका; माजी राष्ट्रपती प्रणवदांचे चिरंजीव अभिजीत मुखर्जींचा टीएमसीत प्रवेश

पुष्कर सिंह धामी यांनी घेतली उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ; ज्येष्ठ नेत्यांचाही मंत्रिमंडळात समावेश

ममता बॅनर्जींशी जुळवून घेण्यासाठी चौधरींना लोकसभेतील नेते पदावरून हटवणार?; काँग्रेसच्या हालचाली सुरू

(Union Cabinet Expansion new ministers likely to take oath on July 7 says Government source)