भोपाळ | 7 नोव्हेंबर 2023 : केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्यासोबत आज मोठी अपघाताची घटना घडलीय. या अपघातात ते सुदैवाने बचावले आहेत. पण एका दुचाकीस्वाराचा या अपघातात मृत्यू झालाय. तर इतर तीन जण जखमी झाले आहेत. प्रल्हाद सिंह पटेल हे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून ते सुखरुप असल्याची माहिती समोर आली आहे. पण संबंधित घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. संबंधित घटना ही मध्य प्रदेशच्या छिंदवाडा येथे घडली आहे.
प्रल्हाद सिंह यांचा ताफा छिंदवाडा येथून नरसिंहपूरच्या दिशेला जात होता. यावेळी समोरुन अचानक एक दुचाकीस्वार आला. त्या दुचाकीस्वाकाला वाचवण्याच्या प्रयत्नात प्रल्हाद सिंह पटेल यांची गाडी रस्त्याच्या खाली उतरली. पण तरीही ही दुर्दैवी घटना घडलीच. या अपघातात 35 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय.
मध्य प्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. याच निवडणुकीच्या निमित्ताने प्रल्हाद सिंह पटेल हे छिंदवाड्यात आले होते. ते छिंदवाडा येथून कार्यक्रम आटोपून नरसिंहपूर जात होते. या दरम्याव संबंधित अपघाताची घटना घडली. विशेष म्हणजे प्रल्हाद पटेल हे नरसिंहपूरच्या मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार देखील आहेत. पण त्यांच्यासोबत आज ही अनपेक्षित आणि दुर्देवी घटना घडली आहे.
या अपघातात नुकसानग्रस्त झालेल्या फॉर्च्यूनर कारचा व्हिडीओ देखील समोर आलाय. गाडीला बसलेली धडक इतकी मोठी आहे की गाडीच्या पुढच्या भागाचं प्रचंड नुकसान झालंय. व्हिडीओत एक व्यक्ती प्रचंड जखमी दिसत आहे. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झालाय.
दरम्यान, मध्य प्रदेशात जोरदार प्रचाराचा धुराळा सुरु आहे. राज्यातील 230 विधानसभा मतदारसंघांसाठी 17 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष जोमाने काम करत आहेत. भाजप, काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि मायावती यांचा बसपा पक्षाने अनेक मतदारसंघांमध्ये उमेदवारांना निवडणुकीच्या रणांगणात उतारलं आहे.