पठ्ठ्याची बातच न्यारी, गावात पहिल्यांदाच चक्क हेलिकॉप्टर आलं; गावकऱ्यांना वाटलं गावात…

| Updated on: May 31, 2023 | 1:49 PM

शेतकऱ्याच्या मुलाने आपला विवाह सोहळा पार पाडला आहे. त्याने आपल्या लग्नात नवरीसाठी चक्क हेलिकॉप्टर आणलं होतं. गावात पहिल्यांदाच हेलिकॉप्टर आल्याने गावकरीही हैराण आणि आश्चर्यचकीत झाले होते.

पठ्ठ्याची बातच न्यारी, गावात पहिल्यांदाच चक्क हेलिकॉप्टर आलं; गावकऱ्यांना वाटलं गावात...
wedding
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

टीकमगड : मध्यप्रदेशातील टीकमगड जिल्ह्यात एक आगळीवेगळी घटना घडली आहे. ज्या गावात कधीच हेलिकॉप्टर उतलं नव्हतं. तिथे पहिल्यांदाच हेलिकॉप्टर उतरलं. लोकांना वाटलं गावात मुख्यमंत्री किंवा एखादा मंत्री आला असेल. पण हेलिकॉप्टरमधून चक्क नवरी उतरली अन् गावकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. या गावात झालं नव्हतं असं अनोखं लग्न झालं. लग्न झाल्यानंतरही या गावात अजूनही लग्नाचीच चर्चा सुरू आहे.

टीकमगड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या पोरानं ही करामत केली. आपल्या सूनेचं घरात शानदार आगमन व्हावं अशी वडिलांची इच्छा होती. ती पूर्ण करण्यासाठीच त्याने पत्नीला चक्क हेलिकॉप्टरमधून आणण्याचा प्लॅन केला. सत्यभानचं लग्न उत्तर प्रदेशातील बरेली येथे झालं. मुलीकडचे लोक टीकमगडच्या जतारा येथे आले. यावेळी गावात हेलिकॉप्टर पाहून गावकरी आश्चर्यचकीत आणि आनंदित झाले. आमच्या गावात कधी हेलिकॉप्टर येईल याचा आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता, असं गावकरी म्हणतात.

हे सुद्धा वाचा

कुटुंबीयांची इच्छा

माझं लग्न वेगळ्या पद्धतीने व्हावं, गावकऱ्यांच्या कायम स्मरणात राहावं. नातेवाईकांनीही या लग्नाचं नाव काढावं, अशी कुटुंबीयांची इच्छा होती, असं नवरदेव सत्यभान यांनी सांगितलं. जेव्हा आमचं हेलिकॉप्टर गावात आलं. तेव्हा लोकांना सुरुवातीला वाटलं मुख्यमंत्री किंवा एखादा मंत्री आला असेल. मात्र, नवरीसाठी हेलिकॉप्टर आल्याची माहिती जेव्हा त्यांना मिळाली. तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटलं. नवरीला नेण्यासाठी हे हेलिकॉप्टर आणण्यात आलं होतं. झांसी हायवेवर एका आलिशान हॉटेलात हा लग्न सोहळा पार पडला.

दिल्लीत स्वप्न पाहिलं

सत्यभान हा इंटरमीडिएट परीक्षेत पास झाल्यानंतर कामासाठी दिल्लीत गेला होता. त्यावेळी तो स्टॉक मार्केटमध्ये काम करणाऱ्या तरुणांच्या संपर्कात आला. त्याने या तरुणांसोबत काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याचे दिवसही बदलले. विमानातून प्रवास सुरू झाला. दोन वर्षापूर्वी जेव्हा मी हेलिकॉप्टरमध्ये बसलो तेव्हा पत्नीला हेलिकॉप्टरमधूनच तिच्या माहेरी पाठवण्याचा विचार मनात घोळू लागला. तेव्हाच मी तयारी सुरू केली होती. आज स्वप्न प्रत्यक्षात उतरलं, असं त्याने सांगितलं.