अयोध्या | 19 जानेवारी 2024 : अयोध्येत येत्या 22 जानेवारीला प्रभू श्रीरामांच्या मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. अतिशय भव्यदिव्य असा हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला 6 हजार पेक्षा जास्त व्हीआयपी येणार आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. पण या कार्यक्रमाकडे काही समाजकंटकांची दृष्ट नजर सुद्धा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेश एटीएसने अयोध्या येथून तीन इसमांना अटक केली आहे. या तीनही तरुणांचा संबंध हा खलिस्तानी दहशतवादी संघटनेशी आहे.
तीनही तरुण हे राजस्थानचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. शंकर लाल, अजित कुमार, प्रदीप पुनिया अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे तीनही आरोपी आपल्या गाडीला श्रीरामांचा झेंडा लावून अयोध्याची रेकी करत होते. अटकेतील आरोपी शंकर लाल याने याबाबतचा खुलासा केल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपी शंकर लाल हा कॅनडा येथील खलिस्तानी समर्थक हरमिंदर उर्फ लांडा याच्या संपर्कात होता. हरमिंदरने खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत याच्या आदेशानुसार शंकर लाल याला अयोध्याची रेकी करण्यास सांगितलं होतं. तसेच त्याने शंकर लाल याच्याकडे अयोध्येचा नकाशा मागितला होता. हरमिंदरच्या सांगण्यावरुनच तीनही तरुण अयोध्येत आले होते. आरोपी रेकी केल्यानंतर अयोध्येत काही दिवस थांबणार होते. त्यानंतर ते तिथे मोठा घातपात घडवण्याच्या कट आखत होते.
विशेष म्हणजे एटीएसने अटक केलेला शंकर लाल हा राजस्थानचा कुख्यात गुंड आहे. त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. तो कॅनडाच्या अनेक गुंडांच्या संपर्कात होता. ते सर्व गुंड खलिस्तानी दहशतवाद्यांशी संबंधित आहेत. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी आरोपींनी आपल्या स्कॉर्पिओ गाडीला श्रीरामांचा झेंडा लावला होता. या गाडीतून ते अयोध्येत रेकी करत होते. विशेष म्हणजे आरोपींना अटक झाल्यानंतर सिख फॉर जस्टिसचा चीफ अतिरेकी गुरपतवंत सिंह पन्नू याने एख ऑडिओ क्लिप जारी करत आरोपींचं समर्थन केलं होतं. आता उत्तर प्रदेश एटीएस या कनेक्शनाच सखोल तपास करत आहे.