लखनऊ : राज्यासह देशभरात
कोरोनाने प्रचंड थैमान घातलं आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात थोड्याअधिक प्रमाणात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, तरीही बरेच नागरिक कोरोना नियमांचं पालन करताना दिसत नाही. अशा नागरिकांना आता पोलीस आणि प्रशासनाकडून योग्य उत्तर मिळताना दिसत आहे. उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये तर पोलिसांनी नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करत तेथील दोन क्विंटल जिलेबी आणि 1050 समोसे जप्त केले आहेत (UP Unnao Police seized 2 quintal jalebi and 1050 samosa).
नेमकं प्रकरण काय?
उत्तर प्रदेशात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. याच निवडणुकांची रणधुमाळी सध्या तिथे बघायला मिळत आहे. मतदारांना आकर्षित करावं, आपल्या बाजूने त्यांनी मतदान करावं यासाठी उमेदवार अनेक शक्कल लढवत असतात. काही उमेदवार प्रचार करत घरोघरी जाऊन लोकांच्या भेटीगाठी घेतात. तर काही उमेदवार वेगवेगळ्या प्रकारचे आश्वासनं देतात. मतदारांना आकर्षित करण्यासाठी तसाच काहीसा वेगळा प्रयोग उन्नावच्या एका ग्रामपंचायत निवडणुकीला उभ्या असलेल्या एका उमेदवाराने करण्याचा प्रयत्न केला.
हसनगंज ग्रामपंचायतीच्या उमेदवाराचा वेगळा प्रयोग
उन्नावच्या हसनगंज ग्रामपंचायत निवडणुकीला तेथील एका उमेदवाराने मतदारांसाठी जिलेबी आणि समोसे वाटपाचा बेत आखला होता. त्याने तशी तयारी केली. त्याने मोठा मंडप बांधला. चार ते पाच आचारींना जिलेबी आणि समोसे बनवण्याचं निमंत्रण दिले. त्यांनी ते निमंत्रण स्वीकारलं आणि ते कामासाठी आले. आचारींनी मस्तपैकी जिलेबी, समोसे बनवले. जिलेबी आणि समोश्यांचा खमंग सुगंध परिसरात दरवळत होता. वातावरणात सर्वत्र आनंद पसरलेला होता. पण अचानक याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांकडून जिलेबी आणि समोसे जप्त
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कारवाई करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तयार केलेली सर्व जिलेबी जप्त केली. ही जिलेबी जवळपास दोन क्विंटल होती. याशिवाय 1050 समोसे तयार होते. पोलिसांनी संपूर्ण समोसे जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईची सध्या संपूर्ण देशभरात चर्चा आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणताही कार्यक्रम, सणवार जरुर साजरी करावा, पण कोरोना नियमांचंही पालन करावं. नाहीतर अशाचप्रकारे कारवाई होऊ शकते.