संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल १६ एप्रिल रोजी जाहीर झाला. या निकालात देशातून आदित्य श्रीवास्तव हे टॉपर ठरले. या निकालात यश मिळवणाऱ्या उमेदवारांची यशोगाथा आता समोर येऊ लागली आहे. परंतु उदय कृष्ण रेड्डी यांचे यश वेगळेच ठरले आहे. ते कॉन्स्टेबल म्हणून नोकरी करत होते. परंतु अधिकाऱ्याने अपमान केला. त्याचा राग आला. त्यानंतर राजीनामा दिला. यूपीएससीची तयारी सुरु केली. अखेरी यश मिळवले. त्यांना यूपीएससीमध्ये 780 रँक मिळाली आहे.
यूपीएससी परीक्षा जगातील सर्वात कठीण परीक्षा समजली जाते. परीक्षेला लाखो विद्यार्थी बसतात. परंतु उतीर्ण होण्याचे प्रमाण शेकडोच्या संख्येत आहे. आंध्र प्रदेशातील उदय कृष्ण रेड्डी आंध्र प्रदेश पोलीस दलात कॉन्स्टेबल होते. पाच वर्ष ते कॉन्स्टेबल म्हणून काम करत होते. 2018 मध्ये एक घटना घडली. त्यांचा सर्कल इंस्पेक्टरने जवळपास 60 पोलीस कर्मचाऱ्यांसमोर अपमान केला. यामुळे संवेदनशील असलेल्या उदय कृष्ण रेड्डी नाराज झाले. त्यांचा मनातून तो अपमान निघत नव्हता. मग त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर यूपीएससी परीक्षा देऊन आयएएस बनवण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
उदय कृष्णा रेड्डी हे आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील सिंगरायकोंडा मंडळातील उल्लापलेम गावचे रहिवासी आहेत. त्यांचे आई-वडीलांचा मृत्यू झाला आहे. उदय यांच्या आजीने त्यांना वाढवले. त्यांचे शिक्षण पूर्ण केले. नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर उदय कृष्णा रेड्डी यांनी पाच वर्षे तयारी केली. २०२३ मध्ये यूपीएससीची परीक्षा दिली. निकाल आला तेव्हा त्याला 780 वा क्रमांक मिळाला. आपल्या निकालाबाबत त्यांनी सांगितले की, जोपर्यंत तो आयएएस अधिकारी होत नाही तोपर्यंत तो अभ्यास सुरू ठेवणार आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (यूपीएससीचा) निकालात महाराष्ट्राचा यंदा डंका वाजला. राज्यातून ८७ पेक्षा जास्त जणांना यश मिळाले. मराठीचा टक्का आता यूपीएससीमध्ये वाढला आहे.