IAS Success Story : UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी भरपूर अभ्यास करावा लागतो. परीक्षेत तीन टप्प्यातून जावे लागते. जेथे मोठे आव्हानं असतात. पण जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणीही या परीक्षेत पास होऊ शकतं. स्पर्धा परीक्षांमध्ये आता स्पर्धाही भरपूर वाढली आहे. अनेकांना आयएएस होण्याचं स्वप्न असतं. पण सगळ्यांचीच स्वप्न पूर्ण होतात असं नाही, काहींना लगेच यश मिळतं तर काहींना अनेक प्रयत्न करावे लागतात. अशाच उमेदवारांसाठी इतर अधिकाऱ्यांचं उदाहरण हे प्रेरणादायी ठरु शकतं. आज आम्ही तुम्हाला अशीच एक गोष्ट सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला नक्की प्रेरणा मिळू शकते. डॉक्टर बनून आयएएस अधिकारी बनणारी मुद्रा सर्वांसाठी एक उदाहरण आहे.
आयएएस अधिकारी मुद्रा गायरोला यांनी स्वत:च्या महत्त्वाकांक्षा कुटुंबाच्या महत्त्वाकांक्षासाठी बाजुला ठेवले. मुद्रा ही उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील कर्णप्रयागची रहिवासी. सुरुवातीपासूनच अभ्यासात टॉपर. तिला 10वी बोर्डाच्या परीक्षेत 96 टक्के आणि 12वीमध्ये 97 टक्के गुण मिळाले होते. या कामगिरीमुळे तिचा पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झाला.
मुद्राने 12वी नंतर डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला आणि दंतचिकित्सक म्हणून चांगलं यश मिळवलं. तिने बीडीएसच्या अभ्यासातही सुवर्णपदक पटकावले आहे. मुद्राला डेंटिस्ट व्हायचे होते आणि ती तिच्या स्वप्नाच्या अगदी जवळ होती, पण तिने स्वतःच्या स्वप्नापेक्षा तिच्या वडिलांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचं ठरवलं.
मुद्राचे वडील अरुण गायरोला यांना स्वतः भारतीय प्रशासकीय सेवेत काम करण्याची इच्छा होती. त्यांना आयएएस अधिकारी बनून देशाची सेवा करण्याची इच्छा होती. 1973 मध्ये त्यांनी परीक्षा देखील दिली होती. पण ते अपयशी ठरले. त्यांचं स्वप्न त्यांनी मुलीसाठी पाहिले. मुलीने ही वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत केली.
मुद्राच्या वडिलांना त्यांचे अपूर्ण स्वप्न मुलीद्वारे साकार करायचे होते. आयएएस होण्याचा दृढनिश्चय त्यांनी केला होता. आपल्या मुलीला यूपीएससी परीक्षा देण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले. 2018 मध्ये, मुद्रा मुलाखत फेरीपर्यंत पोहोचली, परंतु अंतिम फेरीत प्रवेश करू शकली नाही.
2021 मध्ये मुद्राने 165 व्या क्रमांकासह यश संपादन केले. ज्यामध्ये तिला आयपीएस कॅडर मिळाले. पण वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे मुद्राच्या मनात कुठेतरी अजून ती खंत होती. त्यानंतर तिने तिसऱ्यांदा परीक्षा दिली आणि शेवटी वडिलांची इच्छा पूर्ण केली. पण त्यानंतर काही दिवसातच त्यांचे निधन झाले. UPSC CSE 2022 परीक्षा उत्तीर्ण केले आणि मुद्रा परीक्षेत 53 व्या क्रमांकाने पात्र ठरली.