G 20 Summit | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन दिल्लीत दाखल, जगभरातील 32 बडे नेते भारतात

| Updated on: Sep 08, 2023 | 7:44 PM

भारतात दोन दिवसांची जी 20 परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेसाठी जगभरातील 32 मोठे आणि ताकदवान नेते भारतात दाखल झाले आहेत. जगभरातील इतक्या मोठ्या नेत्यांनी भारतात येणं ही खूप मोठी गोष्ट आहे.

G 20 Summit | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन दिल्लीत दाखल, जगभरातील 32 बडे नेते भारतात
Follow us on

नवी दिल्ली | 8 सप्टेंबर 2023 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत G 20 परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे दिल्लीला आले आहेत. ते रविवार संध्याकाळपर्यंत भारतात राहणार आहेत. जी 20 परिषद ही दोन दिवसांसाठी आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद आटोपल्यानंतर रविवारी बायडन अमेरिकेला परतणार आहेत. विशेष म्हणजे जो बायडन दिल्लीत दाखल होण्याआधी आज संध्याकाळी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे देखील भारतात दाखल झाले आहेत.

जी 20 परिषदेच्या अनुषंगाने जगभरातील दिग्गज नेते दिल्लीत दाखल होत आहेत. दिल्लीच्या प्रगती मैदानात उद्यापासून दोन दिवस जी 20 शिखर परिषद सुरु होणार आहे. या भव्य आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी राजधानी दिल्ली देखील सज्ज झालीय. केंद्र सरकारने सर्व पाहुण्यांच्या स्वागतासाठी जंगी तयारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मंत्र्यांना याबाबत सूचना देखील केली आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेतली जात आहे.

जगभरातील दिग्गज नेते दिल्लीत दाखल

जी 20 परिषदेसाठी आतापर्यंत ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, दक्षिण कोरियाचे राष्ट्रप्रमुख यून सुक-येओ, सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, दक्षिण आफ्रिकेचे प्रमुख सिरिल रामाफोसो, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, तुर्कीयेचे अध्यक्ष तैयप एर्दोगन, अर्जेंटिनाचे अध्यक्ष अल्बर्टो फर्नांडिस, नायजेरियाचे अध्यक्ष बोला टिनुबू, चीनचे पंतप्रधान ली कियांग हे मान्यवर दिल्लीत दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “अतिशय ऐतिहासिक अशी ही घडामोड आहे. जगभरातील 32 ताकदवान नेते दिल्लीत आले आहेत. जी 20 ची अठरावी परिषद आहे. भारताच्या दृष्टीकोनाने परराष्ट्र व्यवहारासाठी ही महत्त्वाची परिषद आहे. जो बायडन हे परिषदेच्या एक दिवस आधीच भारतात दाखल झाले आहेत. भारत देश जी 20 चा सदस्य बनल्यानंतर पहिल्यांदाच देशाला अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आहे”, असं शैलेंद्र देवळाणकर म्हणाले.

“जगातील सर्वात प्रभावी अशी ही संघटना आहे. जागतिक लोकसंख्येच्या 75 टक्के लोकसंख्या ही G 20 च्या अंतर्गत येते. ही एकमेव अशी संघटना जी 44 वित्तीय संस्थांना मार्गदर्शन करते. अशा संघटनेचं अध्यक्षपद मिळणं, त्या दृष्टीकोनाने भारताने जो काही अजेंडा ठेवला आहे तो पूर्ण होणं हे एकंदरीतच भारताच्या वाढत्या प्रभावाची पावती आहे”, अशी प्रतिक्रिया शैलेंद्र देवळाणकर यांनी दिली.